पोलीस दलात निवड झालेल्या लक्ष्मीला निरोपासाठी सारे गाव झाले भावनाविवश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 12:24 AM2021-03-29T00:24:48+5:302021-03-29T00:29:54+5:30
पोलीस दलात निवड झालेल्या लक्ष्मीला निरोपासाठी सारे गाव भावनाविवश झाले होते.
प्रमोद ललवाणी
कजगाव, ता.भडगाव : ग्रामीण भागात आजदेखील प्रेमाचं वलय कायम आहे. प्रेमभाव आजही जिवंत आहे. सुख असो वा दु:ख यात सारेच सहभागी होत असतात. एकतेचे जिवंत उदाहरण आजदेखील ग्रामीण भागात पहावयास मिळते. गोंडगाव येथील कन्या लक्ष्मी चौधरी हिची सैन्यदलातील आसाम रायफलमध्ये पोलीस शिपाई म्हणून निवड झाली आहे. ती प्रशिक्षणासाठी नागालँड जाणार असल्याने तिला निरोप देण्यासाठी सारा गावच एकवटला होता. याप्रसंगी प्रत्येकाचे डोळे पाणावले.
गोंडगाव येथील रहिवासी धनराज चौधरी यांची कन्या लक्ष्मी चौधरी हिची आसाम रायफलसाठी निवड झाली. दि.२७ रोजी ती प्रशिक्षणासाठी नागालँड येथे जाणार असल्याने सारा परिवार, आप्तेष्ट व ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते. प्रशिक्षणासाठी रवाना होताना घराच्या परिसरात जसा मुलीचा बिदाई समारंभच होत असल्याचे वातावरण तयार झाले होते. लक्ष्मी घरातून बाहेर आल्यावर परिवाराच्या महिला सदस्यांना गळाभेट घेत ओक्साबोक्शी रडत असल्याने उपस्थित साऱ्यांचे डोळे पाणावले होते.
याप्रसंगी देशभक्तीवर आधारित धून, गाणे याद्वारे लक्ष्मीला निरोप देण्यात आला, तर अनेक युवकांनी देशभक्तीवर आधारित धुनवर व्हिडीओ बनवत तो सोशल मीडियावर टाकला. निरोप समारंभाचा हा व्हिडीओ अनेकांना भावला तर हा पहाता पहाता अनेक महिलांनी अश्रूंला वाट मोकळी करून दिली. निरोप समारंभप्रसंगी परिवार, आप्तेष्ट, गावातील ग्रामस्थ, महिला उपस्थित होते.