लेवा-मराठा लढतीत सरशी कुणाची? नाराजांना सोबत घेत खडसे व पाटील रणांगणात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 07:17 AM2024-05-11T07:17:38+5:302024-05-11T07:18:06+5:30
रावेर लोकसभा मतदारसंघ हा तसा भाजपचा बालेकिल्ला आहे. सन १९९८ मध्ये काॅंग्रेसकडून डाॅ. उल्हास पाटील हे विजयी झाले होते.
- विलास बारी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सलग दोन वेळा विजयी ठरलेल्या भाजप उमेदवार रक्षा खडसे यांना या निवडणुकीत हॅट्ट्रिकची संधी असताना काही दिवसांपूर्वी शरद पवार गटात दाखल झालेल्या श्रीराम पाटील यांनी त्यांच्यापुढे आव्हान निर्माण केले आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघ हा तसा भाजपचा बालेकिल्ला आहे. सन १९९८ मध्ये काॅंग्रेसकडून डाॅ. उल्हास पाटील हे विजयी झाले होते. त्यानंतर आतापर्यंत भाजप सतत विजयी होत आलेला आहे. सलग दोन वेळा खासदार राहिलेले स्व. हरिभाऊ जावळे यांचे २०१४ मध्ये लोकसभेचे तिकिट कापण्यात येऊन रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर सलग दोन वेळा रक्षा खडसे यांनी मोठा विजय मिळविला; परंतु यावेळी त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळते किंवा नाही याबाबत अनिश्चितता असताना त्यांनी उमेदवारी मिळविली. त्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून झालेला विरोध शमविण्यात मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजप नेत्यांना यश आल्याचे दिसते.
एकनाथ खडसे सक्रिय, रोहिणी खडसे विरोधात
रक्षा खडसे यांना भाजपने उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांचे सासरे एकनाथ खडसे यांनी शरद पवार गटाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत, रक्षा यांच्या प्रचाराची सुत्रे हाती घेतली आहेत. त्यांच्या कन्या आणि रक्षा खडसेंच्या नणंद रोहिणी खडसे-खेवलकर यांनी मात्र शरद पवार यांच्या सभेत हजेरी लावत श्रीराम पाटील यांना मुक्ताईनगरमधून लीड देण्याची जबाबदारी आपली असल्याचे स्पष्ट केले आहे. तिकडे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, चोपड्याचे माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे हे सक्रिय नाहीत. इकडे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील व माजी आमदार संतोष चाैधरी यांची नाराजी दूर झाली किंवा नाही ते मतपेटीत दिसणार आहे.
लेवा विरुद्ध मराठा लढतीत प्रतिष्ठा पणाला
nभाजपने रक्षा खडसे यांना उमेदवारी देत लेवा पाटीदार व गुजर समाजाला आपल्याकडे वळविण्याचे नियोजन केले आहे.
nशरद पवार गटाकडून उच्चशिक्षीत व यशस्वी उद्योजक असलेल्या श्रीराम पाटील यांना उमेदवारी देत मराठा कार्डचा वापर केला आहे. त्यामुळे लेवा पाटीदार विरुद्ध मराठा अशी ही लढत आहे.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
केळी पिक विम्याची प्रलंबित रक्कम तसेच केळी महामंडळाची घोषणा झाली मात्र, त्याची अंमलबजावणी झालेली नाही. या मुद्द्याचे विरोधकांनी भांडवल केले आहे.
सलग दोन वेळा खासदार असलेल्या रक्षा खडसे यांनी देशाची सुरक्षा, मोदी सरकारची विकास कामे, उज्ज्वला योजना, किसान सन्मान निधी, मतदार संघातील रस्ते व रेल्वेविकास या मुद्यांवर प्रचारात भर दिला आहे.