जे ग्रामसेवक ऐकत नाहीत त्यांना का मारून टाकू?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2017 12:58 AM2017-04-07T00:58:15+5:302017-04-07T00:58:15+5:30
बीडीओंचे सरपंचांना उत्तर : पं.स.मध्ये ग्रामसेवकांच्या बैठकीत सदस्य अधिकाºयांमध्ये खडाजंगी, ३० ग्रामसेवकांना नोटिसा
जळगाव : ग्रामसेवकांना समज देऊन, पाठपुरावा करून कामे मार्गी लावून घेण्याचा प्रयत्न प्रशासन करते... पण जे ग्रामसेवक ऐकतच नाहीत... त्यांना आम्ही का मारून टाकायचे.. असा संताप पं.स.च्या गटविकास अधिकारी (बीडीओ) एस.पी.सोनवणे यांनी गुरुवारी ग्रामसेवकांच्या आढावा बैठकीत खेडी खुर्द येथील ग्रामसेवकाविषयी सरपंच यांनी केलेल्या तक्रारीबाबत स्पष्टीकरण देताना केला. यातच घरकुलांची अपूर्ण कामे, शौचालयांचे प्रश्न यावरून सरपंच, पं.स.चे सदस्य व गटविकास अधिकारी यांच्यात जोरदार खडाजंगीही झाली.
पं.स.च्या सभागृहात घरकुले, स्वच्छतागृहे याबाबत आढावा बैठक झाली. सभापती यमुना रोटे, उपसभापती शीतल पाटील, सदस्य नंदलाल पाटील, अॅड.हर्षल चौधरी, ज्योती तुषार महाजन, संगीता चिंचोरे, खेडी खुर्दचे सरपंच कैलास चौधरी आदी उपस्थित होते.
पं.स. सदस्य बीडीओंवर चिडले
सदस्य अॅड.हर्षल चौधरी यांनी मनोगत व्यक्त करताना स्वच्छतेचे मिशन केंद्रीय सरकारने हाती घेतले असून, शौचालये व घरकुले हे गंभीर विषय आहेत, असे चौधरी म्हणाले. पण गटविकास अधिकारी सोनवणे या मोबाईलमधील संदेश पाहत होत्या..., अशातच चौधरी म्हणाले, मॅडम आपण पं.स.च्या प्रमुख आहात..., पण आपल्याला मोबाईल अधिक महत्त्वाचा वाटत असेल तर हगणदरीमुक्ती, घरकुले यासंबंधी कसे यश मिळेल, असा सवाल चौधरींनी केला. त्यानंतर बीडीओ सोनवणे यांनी लागलीच मोबाईलमधील लक्ष दूर केले.
सरपंच चौधरी संतापले
अॅड.चौधरी यांचे मनोगत आटोपल्यानंतर लागलीच खेडी खुर्द ता.जळगाव येथील सरपंच कैलास चौधरी यांनी आपल्या गावासंबंधी प्रशासनाची चालढकल वृत्ती असल्याचे सांगत चार महिन्यांपासून पं.स.मध्ये चकरा मारूनही ग्रामसेवक मिळत नाही. कामे खोळंबली..., असे सांगितले. त्यावर बीडीओ सोनवणे यांनी आम्ही ग्रामसेवक दिला होता... असे म्हटले. त्यावर चौधरी म्हणाले, ग्रामसेवक दिला, पण तो एवढा तर्रर्र होता की, त्याला चालता येत नव्हते. तो कसे काम करणार... बीडीओ सोनवणे यांनी लागलीच प्रत्युत्तर देत जो ग्रामसेवक दिला होता तो दुसºया गावात चांगले काम करायचा... तुमच्याच गावात कसा काम करीत नव्हता, असा प्रश्न सरपंच चौधरींना केला. त्यावर चौधरी यांनी आपण ग्रामसेवकांबाबत सारवासारव करू नका... त्यांना कामाला लावा... ज्या ग्रामसेवकाची नियुक्ती खेडी खुर्दला केली ते आजही या आढावा बैठकीत आले नाही... त्यांच्यावर काय कारवाई करणार, असा सवालही चौधरी यांनी केला. त्यावर प्रशासन ग्रामसेवकांकडून कामे करून घेण्याचा प्रयत्न करते, पण जे ऐकतच नाहीत त्यांना मारून टाकू का, असा संताप नंतर बीडीओ सोनवणे यांनी केला.
तर सीईओंकडे तक्रार
अनेक घरकूल लाभार्थींना पहिला हप्ता मिळाला. नंतर दुसरा, अनेकांना तिसरा हप्ता मिळाला नाही. यासंबंधी अशीच दिरंगाई सुरू राहिली तर संबंधित लाभार्थींना सोबत घेऊन सीईओ कार्यालयात तक्रार केली जाईल, अशी ताकीद ग्रामसेवकांना देण्यात आली.
वाद वगैरे झाला नाही, पण खेडी खुर्दचे ग्रामसेवक दारू पिऊन यायचे, अशी सरपंचांची तक्रार होती. ते दारू पीत असतील तर त्यांना माझ्याकडे त्या स्थितीत आणा, त्यांची वैद्यकीय तपासणी करू. मग कारवाई होईल. पण सरपंच माझे काहीही ऐकून घेत नव्हते. त्यांनी माझ्यावर तुम्ही ग्रामसेवकाचा अर्धा पगार घेतात, असा आरोपही केला. मग माझा संयम सुटला. कामे व्हावीत, असाच माझा उद्देश आहे.
-एस.पी.सोनवणे, गटविकास अधिकारी, पं.स., जळगाव
ममुराबादेत कोट्यवधी खर्चूनही दूषित पाणी
ममुराबाद येथे कोट्यवधी रुपये खर्च करून पाणी योजना राबविली, पण तिला गळती आहे. अनेक ठिकाणी दूषित पाणी येते. शुद्धीकरण प्रकल्प व्यवस्थित नाही, अशी तक्रार सदस्या ज्योती महाजन यांनी केली. यावर ग्रामसेवक यांनी आपल्याला माहिती नाही, असे उत्तर दिले. त्यावर ग्रामसेवक सर्व बिले तयार करतात... योजनेबाबतच्या वित्तीय व्यवहारांची माहिती ग्रामसेवकाला असते, मग खराब पाण्याबाबत कशी माहिती देता येत नाही, असा प्रश्न इतर सदस्यांनी केला. गावात दूषित पाणीपुरवठा होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. त्याबाबत प्रशासनाने कार्यवाही करावी, अशी सूचना सदस्यांनी दिली.
फक्त १७ ग्रामसेवक उपस्थित, अनुपस्थितांना नोटिसा
या आढावा बैठकीला फक्त १७ ग्रामसेवक उपस्थित होते. इतर ३० ग्रामसेवक अनुपस्थित राहीले. अनुपस्थित ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटिस बजावण्याचा निर्णय घेतला.
खेडी खुर्दला तातडीने ग्रामसेवकाची नियुक्ती
खेडी खुर्द येथील ग्रा.पं.साठी लागलीच सायंकाळी धीरज सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली.
सरपंचांसोबत घेणार बैठक
पं.स.व तालुक्यातील सर्व सरपंच यांच्यासोबत पुढे स्वतंत्र बैठक घेतली जाईल. प्रशासनातील अधिकाºयांना त्यासाठी बोलावू, असा निर्णय सदस्यांनी घेतला.