खडसेंना मंत्रिमंडळात का घेत नाहीत, कार्यकर्त्यांनी दानवेंना विचारला जाब
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 04:12 PM2018-11-10T16:12:36+5:302018-11-10T17:14:12+5:30
माझ्यावर झालेल्या आरोपांमध्ये मी दोषी आहे का? निर्दोष आहे हे राज्याला कळू द्या, असे आवाहन राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपच्या बैठकीमध्ये केले आहे.
जळगाव- माझ्यावर झालेल्या आरोपांमध्ये मी दोषी आहे का? निर्दोष आहे हे राज्याला कळू द्या, असे आवाहन राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपच्या बैठकीमध्ये केले आहे. भुसावळ येथील आय. एम. ए. हॉल येथे शनिवारी दुपारी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यात कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या व खडसे यांना मंत्रिमंडळात का घेण्यात येत नाही ? या संदर्भात माहिती द्या अशी मागणी केली. तब्बल अर्धा तास कार्यकर्त्यांनी दानवे यांना धारेवर धरले .
यावेळी दानवे यांनी नाथाभाऊ यांना मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संधी मिळणार असल्याचे सांगितले, मी यापूर्वी नाशिक येथील कार्यकर्त्यांना भेटलो होतो, त्यावेळी अशी माहिती दिली होती. मात्र मंत्रिमंडळ विस्तारच झाला नाही. त्यामुळे त्यांना संधी देण्यात आली नसल्याचे कार्यकर्त्यांना समजून सांगायला प्रयत्न केला. मात्र कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी खडसे यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले व पक्षानेसुद्धा माझ्या संदर्भात जो काही निर्णय असेल तो राज्याला कळवावे, असे आवाहन केले. बंदिस्त सभागृहात ही चर्चा झाली. दानवे यांनी बाहेर आवाज जाऊ नये म्हणून खिडक्या बंद करण्याची सूचना कार्यकर्त्यांना दिल्या. दरम्यान कार्यकर्त्यांनी यासंदर्भात निर्णय न घेतल्यास पक्षाचे नुकसान होऊ शकते, असा इशारा त्यांना दिला.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे
१) एकनाथ खडसे दोषी आहेत की नाही हे पार्टी कसे ठरवणार
२) खडसेंवर केवळ बेछूट आरोप
३) खडसेंवर अजूनही आरोप सिद्ध नाही
४) खडसेंचे प्रकरण न्यायप्रविष्ट, आम्हाला पार्टी चालवु द्या.
५) खासदारांच्या कामगिरीबाबत भाजपाकडुन कुठलाही सर्वे नाही, आमच्या खासदारांची कामगिरी उत्तमच
६) पक्षाची आवश्यकता पाहून युतीचा निर्णय, मताचे विभाजन टाळण्यासाठी आमची युतीची तयारी
७) आम्ही मराठा आरक्षण केव्हाच दिलय केवळ न्यायालयाची स्थगिती
८) मागासवर्गीय आयोगाचा अहवाल ३० पर्यंत अहवाल येणार
९) धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही बांधील.