दुष्काळ पाहणीचा फार्स कशाला...?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 06:02 PM2018-11-06T18:02:26+5:302018-11-06T18:02:54+5:30
विश्लेषण
सुशील देवकर
जळगाव- जिल्ह्यात दुग्धव्यवसाय मंत्री महादेव जानकर, त्यापाठोपाठ पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दुष्काळाची पाहणी केली. मात्र राज्य शासनाने दुष्काळसदृश जाहीर केलेल्या १५ पैकी १३ तालुक्यांना केंद्राची समितीच पाहणीनंतर दुष्काळी म्हणून मान्यता देणार असल्याने मंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यांचा फार्स कशासाठी? असा सवाल उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही मंत्र्यांनी दुष्काळाची पाहणी ही महामार्गाने केली. जानकर जळगावहून भुसावळ रस्त्याने यावलकडे रवाना झाले. त्या रस्त्यावर थांबून अगदी महामार्गालगतच्याच शेतात जाऊन पाहणीचा फार्स केला. त्यानंतर यावललाही अशीच धावती पाहणी केली. तेथेही पत्रकारांना सोबत घेत केवळ फोटोसेशन करण्यातच धन्यता मानली. तर पालकमंत्र्यांनी देखील चाळीसगाव ते जळगाव या सध्या चौपदरीकरण सुरू असलेल्या महामार्गावरील गावांची पाहणी केली. ती देखील अगदी सुपरफास्ट गतीने. जळगावात बैठकीसाठी ३ वाजता यायचे असताना ते दुष्काळाची पाहणी करून १२.३० वाजताच जळगावात दाखल होऊन गेले. त्यानंतर दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीतही त्यांनी आज वेळ नाही. दुष्काळाचा आढावा जिल्हाधिकारी घेतलीच, असे सांगून केवळ थातूरमातूर आढावा घेतल्याचे समजते. दुष्काळासारख्या गंभीर परिस्थितीतही पाहणीसाठी, आढावा बैठकीसाठी जर मंत्र्यांना वेळ नाही, तर मग वेळ आहे कशासाठी? असा सवाल उपस्थित झाला आहे. वास्तविक या मंत्र्यांनी केवळ रस्त्याने पाहणी न करताना आत ग्रामीण भागात जाऊन तेथील परिस्थितीची, अडचणींची पाहणी करणे अपेक्षित होते. तेथील ग्रामस्थांशी चर्चा करून भावना समजून घ्यायला हव्या होत्या. मात्र सत्ताधाºयांकडून दुष्काळाचाही ईव्हेंट करून तो कॅश करण्याचाच प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे.