मेंदूपर्यंत संसर्ग पोहचालय का? याची होणार तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:13 AM2021-06-05T04:13:07+5:302021-06-05T04:13:07+5:30
जळगाव : म्युकरमायकोसिसची लागण झालेल्या एका महिला रुग्णावर शुक्रवारी शस्त्रक्रिया होणार होती. मात्र, या महिलेच्या मेंदूपर्यंत बुरशी गेलीय का, ...
जळगाव : म्युकरमायकोसिसची लागण झालेल्या एका महिला रुग्णावर शुक्रवारी शस्त्रक्रिया होणार होती. मात्र, या महिलेच्या मेंदूपर्यंत बुरशी गेलीय का, हे तपासण्यासाठी डॉक्टरांनी त्यांच्या नाकातून सॅम्पल घेऊन ते तपासणीसाठी पाठविले आहे. हे रिपोर्ट आल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. महिलेला बुरशीचा संसर्ग अधिक झाला असल्याचे प्राथमिक निदान समोर आल्यानंतर कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. अक्षय सरोदे व दंतशल्यचिकित्साशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. इम्रान पठाण यांनी महिलेच्या नाकात दुर्बिणीने तपासणी करून या ठिकाणचे सॅम्पल संकलित केले व ते स्थानिक प्रयोगशाळेत पाठिवण्यात आले आहे. एक-दोन दिवसात याचे अहवाल समोर आल्यानंतर नेमका मेंदूपर्यंत संसर्ग झालाय का, याचे निदान होणार आहे. त्यानंतर सहा दिवस इंजेक्शन दिल्यानंतर त्यानंतर शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला जाणार असून याबाबत नातेवाईकांना कल्पना दिल्याचेही डॉक्टरांनी सांगितले.
एका रुग्णाला मुुंबईला हलविले
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील एका रुग्णाला नातेवाईकांनी स्वत: मुंबईला हलविले आहे. यानंतर शुक्रवारी एकही नवीन रुग्ण समोर न आल्याने या ठिकाणी दाखल रुग्णांची संख्या २८ वर पोहोचली आहे. दोन रुग्ण आधीच घरी निघून गेले आहेत.