बाजारात कॉन्सन्ट्रेटर कितीचे याची पडताळणी का झाली नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:21 AM2021-08-14T04:21:29+5:302021-08-14T04:21:29+5:30

जळगाव : जिल्हा रुग्णालय प्रशासनाने जून महिन्यात खरेदी केलेले १२० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आता संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. बीडमध्ये ...

Why is it not verified how many concentrators are in the market? | बाजारात कॉन्सन्ट्रेटर कितीचे याची पडताळणी का झाली नाही?

बाजारात कॉन्सन्ट्रेटर कितीचे याची पडताळणी का झाली नाही?

Next

जळगाव : जिल्हा रुग्णालय प्रशासनाने जून महिन्यात खरेदी केलेले १२० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आता संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. बीडमध्ये जे दर नोंदविले गेले त्यानुसार खरेदी केल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांच्याकडून सांगितले जात आहे. मात्र, शासनाचा निधी असताना बाजारात या कॉन्सन्ट्रेटरची तज्ञाकडून पडताळणी का झाली नाही, असा गंभीर प्रश्न यातून उपस्थित झाला आहे. दरम्यान, शासकीय यंत्रणेने जे कॉन्सन्ट्रेटर स्वीकारले त्यात कुठेही मॉडेलचा उल्लेख नसल्याचेही समोर येत असल्याने या खरेदी प्रक्रियेबाबत सखेाल चौकशीची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी केली आहे.

कॉन्सन्ट्रेटर देताना दुसऱ्या कंपनीचे देण्यात आले आहेत. मात्र, हे दुसरे मॉडेल हायर स्पेसिफिकेशनचे असल्याचे सांगत प्रशासन व पुरवठादार यांच्याकडून आता बचावात्मक पवित्रा घेतला जात आहे. मात्र, नंतर स्पष्टीकरण देण्यापेक्षा जे मंजूर झाले तेच का दिले गेले नाही, असा प्रश्न भोळे यांनी उपस्थित केला आहे. प्रभंजन ऑटोमोबाइलकडून कान्सन्ट्रेटर हे ग्रामीण रुग्णालयातील यंत्रणांनी ५ जुलै रोजी स्वीकारले आहे. त्यावर केवळ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर असे नमूद करण्यात आले आहे. मॉडेल बदलल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. मात्र, या चलनवर कुठेही मॉडेल नंबरचा उल्लेख नसल्याचेही समोर येत आहे. त्यामुळे पुरवठादाराने जे दिले ते योग्यच असे मानत यंत्रणेने ते सरळ हाताने स्वीकारले, त्यामुळे याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे.

लाट नसताना वाढीव किंमत कशी

कोविडची दुसरी लाट ही मार्च, एप्रिलमध्ये अगदी पीकवर होती. त्या काळात वाढीव दराने खरेदी झाल्याचे मान्यही झाले असते. मात्र, जून महिन्यात कोविडची लाट नव्हती, तिसऱ्या लाटेच्या तयारीसाठी जर हे कॉन्सन्ट्रेटर घेतले तरी ते दुपटीपेक्षा अधिक किमतीत का खरेदी करण्यात आले. शासनाकडे कॉन्सन्ट्रेटरची किंमत माहिती असेल, असे एकही तज्ञ नाहीत का? पुरवठादाराने दिलेले दर सरसकट कसे मान्य करण्यात आले, असे काही प्रश्न भोळे यांनी उपस्थित केले आहे. मग ऑनलाइन खरेदी प्रक्रियेला अर्थ काय?

ते कोटेशन प्रभंजनकडून

दहा लिटर्सच्या एका कॉन्सन्ट्रेटरची किंमत ही ५६ हजार रुपये असल्याचे खासगी ग्राहकाला देण्यात आलेले कोटेशन हे प्रभंजन ऑटोमोबाइलकडूनच दिले गेल्याचा पुरावा माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी दिला आहे. याबाबतचे स्क्रीनशॉट त्यांनी दिले आहे. शिवाय प्रभंजन ऑटोमोबाइलकडून देण्यात आलेले हे ५६ हजारांचे कोटेशन हे जुलै महिन्यातीलच आहे. जून महिन्यात झालेल्या शासकीय खरेदी प्रक्रियेत मात्र, याच प्रभंजनकडून सव्वा लाख रुपये किंमत लावण्यात आली. त्यामुळे कोविडच्या नावावर मोठा गैरव्यवहार झाल्याचे भोळे यांनी म्हटले आहे.

Web Title: Why is it not verified how many concentrators are in the market?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.