मराठा समाजाला आरक्षण मग मुस्लिमांना का नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 10:08 PM2019-10-13T22:08:32+5:302019-10-13T22:08:37+5:30

असदुद्दीन ओवेसी : फैजपूर येथील जाहीर सभेत टीका

Why not reservation for the Maratha community? | मराठा समाजाला आरक्षण मग मुस्लिमांना का नाही

मराठा समाजाला आरक्षण मग मुस्लिमांना का नाही

Next




फैजपूर, ता. यावल (जि. जळगाव) : महाराष्ट्रात भाजप सरकार मराठा समाजाला आरक्षण देऊ शकते तर मुस्लिम समाजाला आरक्षण का देत नाही असा सवाल उपस्थित करत भाजप मुस्लिमांवर अन्याय करत आहे असा आरोप एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी रविवारी येथे आयोजित जाहीर सभेत केला.
रावेर विधानसभा मतदारसंघाचे एआयएमआयएमचे उमेदवार विवेक ठाकरे यांच्या प्रचारार्थ शहरातील मिल्लत नगरच्या प्रांगणात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेत बोलताना ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारामुळे देशाच्या कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेवर कडाडून प्रहार केला. तिहेरी तलाख विधेयक चुकीच्या पद्धतीने पारीत झाल्याने मुस्लिम महिलांना न्याय मिळणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वीच्या सत्ताधारी यांच्या उदासीन धोरणामुळे रावेर-यावल भागात उच्च महाविद्यालयीन उर्दू शिक्षणाच्या सोयी उपलब्ध नसल्याने त्यांनी मुसलमानांच्या मतांच्या जोरावर पदे भुषविणाऱ्यांवर जोरदार हल्ला चढविला.
जातीचे राजकारण नाही
एआयएमआयएम फक्त मुस्लिमांची पार्टी असल्याचा आरोप त्यांनी खोडून काढत जातीपातीच्या पुढील राजकारण करीत असल्याचे स्पष्ट केले. त्याचाच भाग म्हणून धोबी समाजाचे प्रदेशाध्यक्ष व सामाजिक चळवळीतुन पुढे आलेले विवेक ठाकरे यांना उमेदवारी दिल्याचे ते म्हणाले.
खासदार ओवेसी यांनी ५८ मिनिटांच्या भाषणात मुस्लीम, दलित व बारा बलुतेदार यांच्यासह केळी व ऊस उत्पादक यांच्या विकासाचा अजेंडा व त्याबाबतचे धोरण राबवणार असल्याचे नमूद केले. डॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरणात सुद्धा सरकार संवेदनशील नसल्याचा त्यांनी आरोप केला.
सभेप्रसंगी उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्ष डॉ.खालिद परवेज यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. जिल्हाध्यक्ष फिरोज शेख, महासचिव मुजाहिद शेख, सुधाकर भंगाळे,कासम खाटीक,राजेंद्र वारके, खुशाल भंगाळे, चैतन्य बोरोले, खेमचंद्र बोंडे, प्रचार समिती प्रमुख अशरफ तडवी, सहप्रमुख नावेद खान, सचिव कलिम खान, झोन अध्यक्ष रेहान जहागिरदार, जळगाव लोकसभा अध्यक्ष जिया बागवान, नावेद खान, फैजपूर शहराध्यक्ष इम्रान शेख, महासचिव इम्रान खान, यावल शहराध्यक्ष आबीद खान, महासचिव वसीम शेख, रावेर शहराध्यक्ष अकबर खान, महासचिव वसीम शेख,असीम खान आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन नईम शेख तर आभार नगरसेवक अक्रम देशमुख यांनी मानले.

केळीला न्याय हाच यापुढे एआयएमआयएमचा अजेंडा
केळीचे विक्रमी उत्पादन काढण्यात रावेर-यावल तालुका अग्रेसर असतांना केळी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळू शकला नाही. केळीला फळाचा दर्जा, विमा संरक्षण, नुकसान भरपाई प्रती हेक्टरी १ लाख मिळावी आणि केळीला शालेय पोषण आहारात समाविष्ठ करणे हा यापुढे एआयएमआयएम पक्षाचा अजेंडा राहील. येत्या अधिवेशनात राष्ट्रीय बागवाणी बोर्ड आणि फलोत्पादन मंत्रालयाला केळीबाबत निर्णय घ्यायला भाग पाडण्यात येईल असेही खासदार असुदोद्दीन ओवेसी यावेळी म्हणाले.

Web Title: Why not reservation for the Maratha community?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.