शाळाच कशाला, पदव्युत्तर शिक्षणातही घटताहेत विद्यार्थी...

By अमित महाबळ | Published: October 8, 2023 06:39 PM2023-10-08T18:39:25+5:302023-10-08T18:39:39+5:30

सध्या पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यार्थी संख्या कमी होत आहे. त्याकडेही गांभीर्याने बघण्याची गरज आहे, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी केले. 

Why schools, students are decreasing even in postgraduate education... | शाळाच कशाला, पदव्युत्तर शिक्षणातही घटताहेत विद्यार्थी...

शाळाच कशाला, पदव्युत्तर शिक्षणातही घटताहेत विद्यार्थी...

googlenewsNext

जळगाव : विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी संलग्नित महाविद्यालयांमधील पदवीच्या विद्यार्थ्यांवर अवलंबून न राहता विद्यापीठांनी कॅम्पसमध्ये पदवी अभ्यासक्रम सुरु करावेत. सध्या पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यार्थी संख्या कमी होत आहे. त्याकडेही गांभीर्याने बघण्याची गरज आहे, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी केले. 

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात रविवारी, सेमीकंडक्टर वेफर प्रक्रियेसाठी धूलिकण विरहित प्रणालीयुक्त प्रयोगशाळेचे उद्घाटन विकासचंद्र रस्तोगी यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा.व्ही.एल.माहेश्वरी होते. विद्यापीठाच्या सल्लागार परिषदेचे अध्यक्ष व जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्राचार्य डॉ.के.बी.पाटील हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.

रस्तोगी म्हणाले की, आपल्या देशात विद्यापीठाकडे उपलब्ध असलेल्या जागांच्या तुलनेत विद्यार्थी संख्या कमी आहे. ही संख्या वाढवावी लागणार आहे. विद्यापीठ आणि प्राधिकरणांचा बहुतांश वेळ हा परीक्षा, संलग्नता आदींमध्ये जातो. विद्यापीठांना पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी संलग्नित महाविद्यालयांमधील पदवीच्या विद्यार्थ्यांची वाट बघावी लागते. सध्या पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यार्थी संख्या कमी होत आहे. त्याकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. त्यासाठी विद्यापीठांनी पदवी अभ्यासक्रम सुरु करावेत, अशी सूचना त्यांनी केली.

त्या महाविद्यालयांना विद्यीपाठाचा दर्जा विचाराधीन
उच्च शिक्षणातील गुणवत्तेसाठी कोणत्याही प्रकारची तडजोड करता कामा नये. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यात देशात महाराष्ट्राचे काम खूप उत्तम आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री हे स्वत: गुणवत्ता व उत्कृष्टतेचा आग्रह धरणारे आहेत, असे सांगून रस्तोगी यांनी भविष्यात स्वायत्त महाविद्यालयांना पदवी प्रदान करणाऱ्या विद्यापीठाचा दर्जा देण्याचा विचार सुरु असल्याचे सांगितले.

यावेळी कौशल्य विकास केंद्राच्या माहितीपत्रकाचे विमोचन तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन (ऑनलाईन) केंद्र आणि भौतिकशास्त्र प्रशाळेत प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले. प्रयोगशाळेची माहिती संचालक प्रा. ए. एम. महाजन यांनी दिली. प्र-कुलगुरु प्रा. एस. टी. इंगळे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, व्यवस्थापन परिषद, सिनेट सदस्य, विद्यापरिषद सदस्य उपस्थित होते. कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पुरूषोत्तम पाटील यांनी केले.
 

Web Title: Why schools, students are decreasing even in postgraduate education...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव