मुख्यमंत्री पदाच्या लायक समजणाऱ्या खडसेंवर पोलीस ठाण्याच्या बाहेर झोपण्याची वेळ का यावी? महाजनांचा खोचक सवाल
By विजय.सैतवाल | Published: October 15, 2022 05:30 PM2022-10-15T17:30:53+5:302022-10-15T18:13:50+5:30
खडसेंंचे डोकं ठिकाणावर आहे की नाही हा तपासाचा भाग
जळगाव : स्वत:ला मुख्यमंत्रीपदाच्या लायक समजणाऱ्या आमदार एकनाथ खडसे यांनी विनाकारण कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट करणे हे चुकीचे आहे. आता गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी एवढ्या मोठ्या नेत्यावर रात्रभर पोलीस ठाण्याच्या बाहेर झोपण्याची वेळ का यावी, हे तपासले गेले पाहिजे, अशी टीका ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर केली.
जळगाव जिल्हा दूध संघात सहा लाख रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार आमदार तथा दूध संघाचे मुख्य प्रशासक मंगेश चव्हाण यांनी दिली होती. त्यानंतर दूध संघातील मालाची चोरी झाली असल्याने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी खडसे यांनी करीत जळगाव शहर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडत रात्रभर पोलीस ठाण्याच्या बाहेर झोपले होते.त्यानंतर शनिवार, १५ ऑक्टोबर रोजी गिरीश महाजन यांनी लोकमत कार्यालयाला भेट दिली, त्या वेळी संवाद साधताना खडसे यांच्यावर वरील टीका केली.
दिल्लीत तीन तास बसून होते खडसे
एकनाथ खडसे व भाजप नेते अमित शहा यांच्या भेटी विषयीच्या मुद्यावर गिरीश महाजन म्हणाले की, एकनाथ खडसे हे दिल्लीत भाजप नेत्यांच्या भेटीसाठी गेल्याचे मला समजल्यावर खडसे यांच्या स्नुषा व खासदार रक्षा खडसे यांना मी मोबाईल लावला. त्या वेळी त्या दिल्लीत होत्या व त्यांच्यासोबत एकनाथ खडसेदेखील होते. जवळपास तीन तास खडसे बसून होते, मात्र शहा यांनी खडसे यांना भेट नाकारल्याचा दावा महाजन यांनी केला. त्यांच्या घरवापसीबाबत पक्षात काहीही हालचाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
खडसेंचा प्रयत्न फसला
महाजन यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांना अडकविण्याच्या मुद्यावर पुन्हा एकदा प्रकाश टाकत गिरीश महाजन म्हणाले की, ॲड. प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयात बसून जो कट रचला गेला, तो निंदणीय असून खडसे यांच्याकडून सुरू असलेले प्रयत्न अगदी खालच्या पातळीवरचे असल्याची टीका त्यांनी केली.