खून झालेल्या पतीनेच मारहाण केल्याचा पत्नीचा बनाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 11:12 AM2019-03-13T11:12:29+5:302019-03-13T11:13:41+5:30

परिचारिकेला धक्काबुक्की

Wife to be assaulted on murderous husband | खून झालेल्या पतीनेच मारहाण केल्याचा पत्नीचा बनाव

खून झालेल्या पतीनेच मारहाण केल्याचा पत्नीचा बनाव

googlenewsNext


जळगाव : आठवड्यापूर्वी पतीचा खून झालेला असताना आता नव्याने याच पतीने मारहाण केल्याचा बनाव पत्नीने केला अन् डॉक्टरांनीही कागदपत्रांची कोणतीही शहानिशा न करता पतीच्या खूनाच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या पत्नीला जिल्हा रुग्णालयात दाखल करुन घेण्याचा प्रताप केला.
दरम्यान, राजकीय दबाव वापरुन आरोपी महिलेला मनोरुग्ण जाहीर करण्याचा प्रयत्न रुग्णालयाकडून होत असल्याचा आरोप मृत तरुणाच्या नातेवाईकांनी केला. या कारणावरुन मंगळवारी जिल्हा रुग्णालयात गोंधळ निर्माण झाला होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नेरी, ता.जामनेर येथे पत्नी कोमल संदीप पवार (२१) हिने पती संदीप (२६) याच्या डोक्यात फरशीचा तुकडा टाकून खून केल्याची घटना ३ मार्च रोजी सकाळी साडे पाच वाजता घडली. या घटनेनंतर कोमल हिनेही फिनाईल प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.या घटनेत कोमल हिला पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही.
औरंगाबादला हलविण्याच्या सूचना कागदावरच
पतीचा खून केल्यानंतर स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या कोमल हिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात ८ मार्चपर्यंत उपचार सुरु होते. येथे ज्या चाचण्या होत नाहीत, त्या चाचण्यांसाठी तिला औरंगाबादला हलविण्याच्या सूचना डॉक्टरांनी केल्या. त्यानुसार कागदोपत्री प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर कोमल हिला रुग्णवाहिकेतून औरंगाबाद न नेता मोहाडी,ता.जामनेर या माहेरी नेण्यात आल्याचा आरोप संदीप याचे मेहुणे संतोष पाटील यांनी केला. दरम्यान, कोमल ही सात महिन्याची गरोदर आहे.
परिचारिकेला धक्काबुक्की
ज्या दिवशी कोमल हिला रुग्णालयात आणले, तेव्हा तिच्यासोबत आलेल्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांशी धक्काबुक्की केली व जबरदस्तीने तिला दाखल करुन घेतले असेही संतोष पाटील यांनी सांगितले. याआधी काय प्रकरण झाले ते मला माहित नाही, परंतु ९ रोजी पतीने मारल्याचे कोमल सांगत होती, म्हणून तिला दाखल करुन घेतल्याचा खुलासा डॉ.बारी यांनी डॉ.किरण पाटील यांच्या दालनात केला.
मारहाणीच्या कारणाने केले दाखल
कोमल हिला ९ मार्च रोजी पुन्हा जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तेव्हा तिने मला पतीने मारहाण केली आहे असे सांगून मागील उपचाराचे कागदपत्रे डॉक्टरांना दाखविले. दुपारनंतर डॉ.मिलिंद बारी यांनी कोमल हिला दाखल करुन घेतले. कोमल हिला औरंगाबाद येथे हलविण्याच्या सूचना असतानाही तिला दाखल करुन घेण्यात आले. त्यासाठी कोणी राजपूत नावाच्या व्यक्तीचा प्रशासनावर दबाव होता. पैसे घेऊन कोमल हिला दाखल करुन घेतले. तिला मनोरुग्ण घोषीत करण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप संतोष पाटील यांनी केला. दरम्यान, वैद्यकिय अधीक्षक डॉ.किरण पाटील यांच्या दालनात डॉ.मिलिंद बारी यांना बोलावण्यात आले होते. तेथे संतोष पाटील यांनी बारी यांच्यावर लाचखोरीचे आरोप केले.

Web Title: Wife to be assaulted on murderous husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.