बायको मोबाईलवर व्यस्त, रोजच्या प्रकाराने पतीदेव त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:16 AM2020-12-22T04:16:16+5:302020-12-22T04:16:16+5:30
जळगाव : बायको सतत मोबाईलवर बोलत असल्याने नवरे कमालीचे वैतागले असून दोघांमध्ये टोकाचे वाद होऊ लागले आहेत. जानेवारी २०१९ ...
जळगाव : बायको सतत मोबाईलवर बोलत असल्याने नवरे कमालीचे वैतागले असून दोघांमध्ये टोकाचे वाद होऊ लागले आहेत. जानेवारी २०१९ ते नोव्हेंबर २०२० या २३ महिन्यात पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला सहाय्य तथा भरोसा कक्षात ३६३ तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्यातील ५० प्रकरणांमध्ये यशस्वी तडजोड घडवून आणण्यात या कक्षाला यश आले आहे. २०१९ या वर्षात २२५ तक्रारी अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी ४० प्रकरणात समजोता घडवून आणण्यात आला तर ५० प्रकरणे न्यायालयात पाठविण्यात आलेली आहेत. १३५ प्रकरणात तक्रारदार पतीच हजर झालेले नाहीत.
जानेवारी ते नोव्हेंबर २०२० या ११ महिन्यात १३८ नवऱ्यांनी बायकोविरुध्द तक्रारी केल्या. त्यापैकी १० प्रकरणात तडजोड झाली तर १३ प्रकरणे न्यायालयात पाठविण्यात आली आहेत. २० प्रकरणात पती हजर झालेले नाहीत, ९५ प्रकरणांमध्ये तडजोडीचे प्रयत्न सुरु आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या अख्त्यारित असलेल्या या सेलचे कामकाज चालते. पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सविता परदेशी, वैशाली पाटील, मनिषा पाटील आदी जण या सेलमध्ये कार्यरत असून तेच हे प्रकरणे हाताळतात. पोलीस अधीक्षक कार्यालयात हा सेल आहे.
ही आहेत नवरा-बायकोमध्ये होणाऱ्या भांडणाची प्रमुख कारणे
पतीने त्याच्या आई, वडीलांपासून लांब रहावे, फक्त पती-पत्नी दोघांनी रहावे यासह पत्नी मोबाईलवरच जास्त बोलत असल्याने त्यावर पती संशय घेतात अशाच प्रामुख्याने तक्रारी नवऱ्यांनी भरोसा सेलकडे केलेल्या आहेत. दारु पिवून आलेलेही काही बायकांना आवडत नाही, तसेच बाहेर फिरायला, खरेदीला घेऊन जावे अशी अपेक्षा बायकांची असल्याची तक्रार नवऱ्यांनी केली आहे.
भरोसा सेलमध्ये
आलेल्या तक्रारी
२२५ (2019)
१३८ (2020)
५० प्रकरणांत समेट
पोलीस अधीक्षक कार्यालयात असलेल्या महिला सहाय्य कक्ष तथा भरोसा कक्षात २३ महिन्यात ३६३ दाखल तक्रारींपैकी ५० प्रकरणात यशस्वीरित्या समेट घडवून आणण्यात आले आहे. या प्रकरणातील पती-पत्नी सुखाने संसार करीत आहेत तर ६ ३ प्रकरणे न्यायालयात पाठविण्यात आलेली आहेत. आता तक्रारींचा ओघ वाढलेला आहे.
कोरोना व लॅाकडाऊन काळात तक्रारींची संख्या कमी होती, त्यात आता वाढ होऊ लागली आहे. आई, वडीलांपासून विभक्त रहावे तसेच मोबाईलवर बोलल्याच्या कारणावरुनच पती-पत्नीत वाद होत असल्याचे प्रकरणे जास्त आहेत. पत्नींप्रमाणे पतींच्याही तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत.
- सविता परदेशी,
महिला सहाय तथा भरोसा सेल