बायको सुटली, जीवनयात्रा संपली. मात्र दारु सोबतीलाच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 01:05 PM2017-09-17T13:05:44+5:302017-09-17T13:08:26+5:30
अनेक कुटुंबाचे दु:ख : दारूच्या तिरडीसाठी वढोद्यासह खिर्डीत महिलांचा लढा
ऑनलाईन लोकमत / हितेंद्र काळुंखे
जळगाव, दि. 17 - विक्रांत 26 वर्षांचा होता. त्याची बायको सुटली, पण दारू नाही सुटली. अखेरचा श्वासही त्याने दारूच्या घोटासह घेतला. विक्रांतचा चूलत भाऊ संतोषही दारूचा बळी ठरला. दारूमुळे आकांत वाटय़ाला आलाय, अशी विक्रांतची आई काही खिर्डी गावात (ता. रावेर) एकटीच नाही. काहींनी मुले गमावली तर काहींनी पती. उशिरा का होईना दारूने पोळलेले नारी शक्तीचे शेकडो हात आता दारुविरुद्ध एकवटले आहेत.
देशी, इंग्लिश, हातभट्टी अशी सर्व दारु बंद व्हावी म्हणून स्त्रीशक्तीच्या संघर्षाला खिर्डी (ता. रावेर) येथे पाच वर्षे उलटलेली आहेत. यासाठी स्त्रीशक्तीच्या जळगाव वा:याही सुरूच आहेत. काहींची तर मजुरीही बुडते. पदरचे एसटी बसचे भाडे खर्च करून या महिला अधूनमधून जळगावला येतात.
दोन दिवसांपूर्वीच विक्रांतच्या मातोश्री अलकाबाई शंकर तावडे आणि अनेक महिला पोलिस अधीक्षक कार्यालयात साहेब केव्हा येतायेत म्हणून वाट बघत बसलेल्या होत्या. ‘आमच्या घरात गमवायला आता काही शिल्लक उरलेलं नाही, पण जे आम्ही भोगलं ते आता गावात कुणाच्याही वाट्याला येऊ नये, असं मला वाटतं म्हणून माझा हा आटापिटा..’ असे या महिलांपैकी एक उषा पाटील यांनी सांगितले.
दारुमुळे विनोद दत्तू कोळी (35), प्रमोद दत्तू कोळी (38) हे दोन्ही भाऊ वर्षभरात एकापाठोपाठ गेले. मुरलीधर रुपचंद कोळी, विजय माधव कोचुरे अशी दारूने संपवलेल्या अनेक तरुणांची नावे ऐकायला मिळाली. खिर्डीतून अनेक तिरडी निघायला ही ‘दारू’ जबाबदार आहे. शाळेतली मुलं सुद्धा गुत्त्यावरून आम्ही पकडलेली आहेत आणि कुटत कुटत घरी आणली आहेत, असेही या महिलांनी सांगितले.
स्वाती भिरूड, शालिनी कोळी, सरपंच पौर्णिमा ठोंबरे, माधुरी पाटील, मीनाक्षी पाटील यांनी दारूविरुद्ध आपली मुठ आवळलेली असून गावात एखादीला तिचा नवरा दारू पिऊन त्रास देत असेल तर या सगळ्या एकत्र तिथं धडकतात आणि आपला इंगा दाखवून देतात. पण या लढय़ाला कायद्याची साथ असणं आवश्यक आहे, अशी या महिलांची अपेक्षा आहे.
वढोदा (ता. चोपडा) येथून आलेल्या कमलबाई विजय भिल, अक्काबाई अहिेरे, मीनाबाई वानखेडे अशा अनेक मद्यपिडित भगिनीही पोलीस अधीक्षक कार्यालयात आलेल्या होत्या. अक्काबाईंनी पती गमावलाय. गावातील दारूचे बळी ठरलेले संदीप शिवाजी पाटील, विजय तंगा पाटील यांच्या घरातील महिलाही दारुविरुद्धच्या या लढाईत उतरल्या आहेत.
दोन्ही गावातील या महिलांची संध्याकाळी साहेबांशी भेट झाली. नियमानुसार नक्की काही तरी करु असे आश्वासन मिळाले. आणि मोठय़ा आशेसह या महिला गावाकडे परतल्या. मात्र दारुचा गावाला मिळालेला शाप मिटलाच पाहिजे, यासाठीचा लढा दारुचा पराभव होई र्पयत सुरुच राहील, असा निर्धारही जाता जात त्यांनी व्यक्त केला.