शिरसोलीत पतीच्या तेराव्याच्या दिवशीच पत्नीने सोडले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:14 AM2021-05-17T04:14:48+5:302021-05-17T04:14:48+5:30
शिरसोली येथील यशवंत बारी (वय ६९) हे जळगाव येथील रत्नाताई जैन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक होते. सेवानिवृत्तीनंतर गुरुजींनी स्वत:ची ...
शिरसोली येथील यशवंत बारी (वय ६९) हे जळगाव येथील रत्नाताई जैन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक होते. सेवानिवृत्तीनंतर गुरुजींनी स्वत:ची शेती कसण्यासह समाजकार्यात झोकून दिले होते. गुरुजी समाजकार्यात मग्न असताना पत्नी प्रमिलाबाई दोन मुलांच्या साह्याने संसाराचा रहाटगाडा हाकण्यात मग्न होत्या. परंतु, नियतीला काही वेगळेच मान्य होते. क्रूर कोरोनाची वक्रदृष्टी त्यांच्या हसत्या खेळत्या घरावर पडली आणि घराचा मुख्य आधारच हिरावून घेऊन गेली.
यशवंत फुसे यांना थोड्याफार प्रमाणात कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने मुलांनी त्यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांनी २० दिवस मृत्यूशी झुंज दिली. अखेर ४ मे रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या दु:खातून कुटुंब सावरत असतानाच पत्नी प्रमिलाबाई बारी (वय ६५) यांनी पत्नीच्या तेराव्याच्या दिवशीच १६ मे रोजी जगाचा निरोप घेतला. या अचानक कोसळलेल्या संकटाने संपूर्ण कुटुंबच हादरून गेले. वडिलांचा तेराव्याचा कार्यक्रम बाजूला ठेवून आईवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. कुटुंबाचे आधारस्तंभ असलेले आई-वडीलच गेल्याने संपूर्ण घरच पोरके झाले. या घटनेने शिरसोली येथे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. प्रमिलाबाई बारी यांच्या पश्चात जगदीश व संदीप अशी दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
-----------------------------
१६ मे रोजी यशवंत बारी यांचा तेराव्याचा उत्तरकार्याचा कार्यक्रम असल्याने पाहुणे रावळे आदल्या दिवशीच घरी जमा झाले होते. परंतु, प्रमिलाबाई यांनी रात्रीच बारा वाजल्यानंतर जगाचा निरोप घेतला. सकाळी नऊ वाजता शिरसोली येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.