पती व मुलावर अंत्यसंस्कार सुरू असताना पत्नीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:29 AM2021-03-13T04:29:45+5:302021-03-13T04:29:45+5:30
दीपक सोनार - १३ सीटीआर ७६ परेश सोनार - १३ सीटीआर ७७ श्रध्दा सोनार - १३ सीटीआर ७८ ...
दीपक सोनार - १३ सीटीआर ७६
परेश सोनार - १३ सीटीआर ७७
श्रध्दा सोनार - १३ सीटीआर ७८
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मेहरूण येथील स्मशानभूमीत पतीसह मुलावर अंत्यसंस्कार सुरू असताना, दुसरीकडे रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या पत्नीचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली. श्रध्दा दीपक सोनार (६०) असे मयत महिलेचे नाव आहे. एकाच दिवसात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शहरातील आदर्श नगरातील दीपक रतिलाल सोनार हे पत्नी श्रद्धा व मुलगा परेश यांच्यासोबत वास्तव्यास होते. सोनार दाम्पत्याचा मुलगा परेश हा गतिमंद होता. पती-पत्नी दोघे सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश देऊन आपल्या संसाराचा गाडा ओढत होते. सोमवारी श्रद्धा सोनार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. डॉक्टरांनी त्यांना न्यूमोनिया असल्याचे सांगत त्यांच्यावर उपचार सुरु केले होते.
पुढील उपचाराची लागली चिंता...
श्रध्दा सोनार यांच्यावर दोन दिवसांपासून उपचार सुरु होते. रुग्णालयाकडून दोन दिवसांचे बिल हे दीड लाख रुपये इतके काढले गेले़. दीपक सोनार यांनी जमा केलेली जमापुंजीची रक्कम ही रुग्णालयात भरून टाकली. परंतु, श्रद्धा सोनार यांना अजून काही दिवस उपचारासाठी रुग्णालयात ठेवावे लागणार होते. सोनार यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने त्यांना पत्नीच्या पुढील उपचारासाठी लागणाऱ्या पैशांबाबत चिंता सतावत होती.
...अन् घेतला टोकाचा निर्णय
एकीकडे पत्नीची प्रकृती दिवसेंदिवस खराब होत असल्याने दीपक सोनार हे प्रचंड तणावात होते. त्यातच त्यांनी आपल्या मुलाला विषारी द्रव्य दिले व त्यानंतर त्यांनी स्वत: विष प्राशन करीत आपली जीवनयात्रा गुरुवारी संपविली होती.
अंत्यसंस्कार आटोपून घरी येत असताना, पुन्हा मिळाली दु:खद बातमी
शुक्रवारी सकाळी पिता-पुत्राच्या मृतदेहांचे विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास दोघांवर एकाचवेळी मेहरूण येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, दोघांवर अंत्यसंस्कार आटोपून घरी येत असताना, त्यांना श्रध्दा सोनार यांचीही प्राणज्योत मालविल्याची माहिती मिळाली. तिघांच्या मृत्यूने नातेवाईकांना धक्काच बसला व प्रचंड आक्रोश करण्यात आला. त्यानंतर दुपारी श्रध्दा सोनार यांच्या मृतदेहावरही मेहरूण येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे सोनार कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
सोनार दाम्पत्य मनमिळावू
सोनार दाम्पत्य हे मनमिळावू स्वभावाचे होते. ते परिवारात मोठे असल्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आम्ही त्यांचा सल्ला घेत होतो. त्यांच्या जाण्यामुळे संपूर्ण सोनार परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे, अशी भावना नातेवाईकांनी व्यक्त केली.