पत्नी रुग्णालयात, घरात पती व मुलाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 07:02 AM2021-03-12T07:02:20+5:302021-03-12T07:02:33+5:30
आदर्श नगरातील घटना : उपचाराला पैसे नसल्याने घेतला आत्महत्येचा निर्णय
जळगाव : दवाखान्यात दाखल असलेल्या पत्नीच्या उपचारावर दीड लाख रुपये खर्च केले, अजून पाच लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याने नैराश्यात आलेल्या दीपक रतीलाल सोनार (वय ६५) व मुलगा परेश (३४) या पिता-पूत्राने राहत्या घरात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री ९ वाजता आदर्श नगरात उघडकीस आली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक सोनार हे पत्नी श्रद्धा व मुलगा परेश यांच्यासह आदर्शनगरात वास्तव्याला होते. पत्नी सराफ बाजारात दागिने पाॅलिश करण्याचे काम करतात. दीपक सध्या घरीच होते तर मुलगा मतीमंद होता. मुलगी रुपाली विवाहित असून नंदुरबारला सासरी असते. पत्नी श्रद्धा यांना निमोनिया व इतर आजार झाल्याने त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारपासून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दीड लाख रुपये खर्च झाले तरी प्रक्रुतीत सुधारणा होत नाही. हा दवाखान्याचा खर्च जावाई रुपेश सोनार यांनी केला. आता अजून पाच लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याने दीपक सोनार नैराश्यात आले होते, असे सांगण्यात आले.
जावयामुळे उघड झाली घटना
मुलगी व जावई रुग्णालयात असताना दीपक सोनार यांना फोन करत होते, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने जावई घरी आले असता त्यांना सासरे व शालक मृतावस्थेत आढळून आले. या घटनेची शेजारी चर्चा होताच मनपा स्थायी समिती चे सभापती राजेंद्र घुगे पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली तातडीने रामानंद नगर पोलिसांना कळविले त्यानंतर रुग्णवाहिका आणून मृतदेह शासकीय रुग्णालयात रवाना केले तेथे डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले दरम्यान रामानंदनगर पोलिस ठाण्याचे हवालदार सतीश डोलारे व सहकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला परंतु दोघांनी नेमके कोणते विषय घेतले हे समजू शकले नाही.
कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह
दीपक सोनार यांच्या पत्नी श्रद्धा या अपेक्स या खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत त्यांना कोरोना असल्याचे सांगितले जात होते, याबाबत खात्री करण्यासाठी रुग्णालयाचे डॉ. समीर चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता श्रद्धा यांची अॅटीजन टेस्ट निगेटिव्ह आलेली आहे, मात्र शुक्रवारी आरटीपीसीआर टेस्ट घेतली जाणार होती. निमोनिया गंभीर स्वरूपाचा असल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचेही डॉ. चौधरी यांनी सांगितले.