पत्नी पाॅझिटिव्ह, लसीकरणामुळे पती निगेटिव्ह !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:16 AM2021-05-14T04:16:31+5:302021-05-14T04:16:31+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधित आणि मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. पोलीस दलात मात्र लसीकरणामुळे ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधित आणि मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. पोलीस दलात मात्र लसीकरणामुळे बाधित व मृत्यूचा आकडा घटलेला आहे. यात विशेष म्हणजे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या पत्नी पॉझिटिव्ह असतानाही ते स्वतः निगेटिव्ह आलेले आहेत. जिल्हा पोलीस दलातील सहा अधिकारी व ३५ कर्मचारी यांच्या बाबतीतला हा अनुभव आहे. लसीकरणामुळेच हे सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचे स्पष्ट मत पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी 'लोकमत’कडे व्यक्त केले आहे.
पहिल्या लाटेत पोलीस दलात ६६१ जण बाधित झाले होते, तर सातजणांचा मृत्यू झाला होता. दुसऱ्या लाटेत १८४ जण बाधित झाले तर फक्त एकाचा मृत्यू झालेला आहे. यात १८४ पैकी १८० नॉर्मल होते, त्यापैकी फक्त चारजण रुग्णालयात उपचार घेत आहेत. पोलीस दलातील ९६ टक्के अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. त्यामुळे या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचा १०० टक्के धोका टळलेला आहे. हे कर्मचारी रोज बाधित लोकांच्या संपर्कात येत आहेत, इतकेच काय त्यांच्या कुटुंबात पत्नी, आई, भाऊ असे व्यक्ती बाधित झाले आहेत. ते बाधित झाल्यामुळे आपल्यालाही त्याची लागण झाली का? याची खात्री करण्यासाठी पोलिसांनी अँटिजन व आरटीपीसीआर चाचणी केली असता त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. लसीकरणामुळेच पोलीस दल सुरक्षित झाले आहे. जनतेनेदेखील लसीचे दोन्ही डोस घेऊन कोरोनापासून संरक्षण मिळवावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केले आहे.
यांच्या कुटुंबातील सदस्य पाॅझिटिव्ह, मात्र ते निगेटिव्ह
पाचोरा पोलीस उपअधीक्षक भारत काकडे, पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, एरंडोलचे निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, अमळनेरचे निरीक्षक जयपाल हिरे, जामनेरचे पोलीस निरीक्षक प्रताप पिंगळे, सहायक निरीक्षक राजेश काळे, उपनिरीक्षक किशोर पाटील, पहूरचे सहायक पोलीस निरीक्षक किरण बर्गे, चाळीसगाव ग्रामीणच्या महिला अंमलदार मालती बच्छाव, कासोद्याचे जितेश पाटील, भडगावचे सहायक फौजदार राजेंद्र पाटील, पारोळ्याचे सुधीर आनंदा चौधरी, आदी अधिकारी, कर्मचारी यांच्या कुटुंबातील सदस्य पाॅझिटिव्ह आलेले आहेत. हे सर्वजण सतत त्यांच्या संपर्कात असल्याने त्यांनी वेळोवेळी कोरोनाची चाचणी घेतली, मात्र ती निगेटिव्ह आली. या सर्व जणांनी कोरोना प्रतिबंधक दोन्ही लस घेतल्या आहेत.
प्रतिक्रिया....
कुटुंबातील सदस्य दिगंबर पाटील यांचा एचआरसीटी स्कोअर १८ होता. त्याशिवाय ऑक्सिजन पातळी ८७ होती. त्यांना शुगर, बीपीचा त्रासदेखील होता. कोरोनाबाधित असल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यापासून ते तब्येत बरी होईपर्यंत एकटीच त्यांच्या सान्निध्यात होती. केवळ दोन्ही लसीमुळे माझा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे.
- मालती बच्छाव, महिला पोलीस, चाळीसगाव
प्रतिक्रिया
आई चंद्रभागा पाटील (वय ७८) कोरोना पॉझिटिव्ह होत्या. त्यांना जळगाव येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. दुसरीकडे वडिलांची प्रकृती बिघडली. त्यांची चाचणी केली असता ती देखील पॉझिटिव्ह आली. सतत रुग्णालय व घरी आई-वडिलांजवळ थांबलो. मात्र, लसीमुळे आपण सुरक्षित राहिलो.
- राजेंद्र पाटील, सहायक फौजदार, भडगाव
प्रतिक्रिया
कोरोनापासून संरक्षण करायचे असेल तर दोन्ही लस घेणे अत्यंत गरजेचे आहे. आम्ही पोलीस दलात हा प्रयोग केला, त्यात १०० टक्के सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. या लसीकरणामुळे पोलीस धोक्याच्या बाहेर असून, सुरक्षित झाले आहेत.
- डॉ. प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक