गळा दाबून पत्नीचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 03:41 PM2019-06-11T15:41:42+5:302019-06-11T15:42:44+5:30
पाचोऱ्यातील घटना : मुलगा होत नाही म्हणून सतत होत होती मारहाण
पाचोरा : तिनही मुलीच झाल्या मुलगा होत नाही म्हणून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना शनिवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास शहरातील विवेकानंद नगर भागातील वंजारी तांडा येथे घडली आहे. या घटनेने प्रचंड खळबळ ुउडाली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, पप्पू रतन पवार (३१) याचा विवाह आनंद नगर निपाने ता.एरंडोल येथील कस्तुराबाई हिच्याशी सुमारे नऊ वर्षांपूर्वी झाला. उभयतांना गौरी (माया),खुशी, भाग्यश्री अशा तीन मुली अनुक्रमे ६,४,२ वर्षाच्या असताना तिनही मुलीच आहेत म्हणून पती पप्पू हा पत्नी कस्तुराबाईचा अतोनात छळ करून रोज दारूच्या नशेत शिविगाळ व सतत मारहाण करीत असे. ९ जून रोजी संध्याकाळी ७.३० च्या सुमारास पप्पू याने कस्तुराबाई हिला मारहाण करून गळा दाबून खून केला. प्रसंगी लहानग्या तिनही मुली घाबरुन घराच्या बाहेर पळाल्या.
पप्पूने लाकडी दांड्यांने पत्नीला मारहाण करीत खून केला.
चक्कर आल्याचा केला बनाव
प्रसंगी कस्तुरबाईला चक्कर येऊन ती पडल्याचा बनाव करीत तिला त्याच अवस्थेत खाजगी रुग्णालयात घेऊन गेला. मात्र महिला जागीच ठार झालेली असल्याने खाजगी दवाखान्यात दाखल होऊ शकली नाही. मात्र पाचोरा ग्रामीण रुग्णालयात तिला मृत घोषित करण्यात आले. घडलेल्या घटनेची माहिती कस्तुराबाईच्या माहेरच्या मंडळींना रात्रीच कळवली. मुलीला चक्कर आल्याचा बहाणा करून मरण पावल्याचे सांगितले.मात्र माहेरच्यांनी कस्तुरबाईचा पतीने खून केल्याचा आरोप केला. त्याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावरून पोलिसांनी मयत कस्तुराबाईचे शवविच्छेदन जळगाव येथे करून पाचोरा येथेच माहेरच्यांनी अंत्यसंस्कार केले. दरम्यान मयताची आई पद्माबाई राठोड याची फिर्याद व शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालावरून पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा रात्री दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली. कस्तुराबाई ही दोन दिवसांपूर्वीच माहेरच्या नातेवाईकांकडील लग्नावरून परत आली होती.
मोठ्या मुलीने केली मारहाणीची कहानी कथन
चिमुकल्या तिन्ही मुलींच्या समक्ष आईला मारहाण झाल्याचे मोठ्या ६वर्षाच्या मुलीने पोलिसांना सांगितले. आरोपी पप्पू पवार यानेही पोलिसांकडे गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव भागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन मोरे, उपविभागिय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे, प्रभारी पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.फौजदार पंकज शिंदे तपास करीत आहेत.