डोलारखेडा वनक्षेत्र क्रिटिकल वाइल्डलाइफ हॅबिटॅट घोषित करण्यासाठी वन्यजीवप्रेमी सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:15 AM2021-05-10T04:15:29+5:302021-05-10T04:15:29+5:30

जिल्ह्यातील वाघांच्या संरक्षणासाठी पुढाकार : राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर (फोटो मेल केले आहेत.) लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : उत्तर ...

Wildlife enthusiasts rush to declare Dolarkheda Forest Critical Wildlife Habitat | डोलारखेडा वनक्षेत्र क्रिटिकल वाइल्डलाइफ हॅबिटॅट घोषित करण्यासाठी वन्यजीवप्रेमी सरसावले

डोलारखेडा वनक्षेत्र क्रिटिकल वाइल्डलाइफ हॅबिटॅट घोषित करण्यासाठी वन्यजीवप्रेमी सरसावले

Next

जिल्ह्यातील वाघांच्या संरक्षणासाठी पुढाकार : राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर

(फोटो मेल केले आहेत.)

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक वाघ असलेल्या मुक्ताई भवानी संवर्धन राखीव वनक्षेत्राच्या अधिक बळकटीसाठी वन्यजीवांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने डोलारखेडा वनक्षेत्रास क्रिटिकल वाइल्डलाइफ हॅबिटॅट चा दर्जा मिळावा यासाठी जिल्ह्यातील वन्यजीव प्रेमींनी आता पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील वाघांचे अस्तित्व अबाधित रहावे यासाठी वन्यजीव संरक्षण संस्थेतर्फे राज्य शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याची माहिती वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा मानद वन्यजीव रक्षक रवींद्र फालक यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील वाघांच्या अस्तित्वासाठी प्रयत्न करत असलेले वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्य राजेंद्र नन्नवरे यांनी राज्य वन्यजीव कृती आराखडा समितीकडे डोलारखेडा वनक्षेत्र संकटग्रस्त वन्यजीव अधिवास क्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठी राज्य वन्यजीव कृती आराखडा समितीकडे देखील प्रस्ताव पाठवला असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे. राज्य मंडळाकडे या प्रस्तावावर मंजुरीची अद्यापही प्रतीक्षा आहे.

वनक्षेत्रात वाढत जाणारी वेडी बाभूळ वन्यजीवांसाठी ठरतेय धोकेदायक

मुक्ताई-भवानी संवर्धन राखीव क्षेत्रातील डोलारखेडा वनक्षेत्र उष्णकटिबंधीय पानझडी व काटेरी-झुडुपी प्रकारचे जंगल आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या डोलारखेडा या गावाच्या उत्तरेस व दक्षिणेस असलेल्या वनक्षेत्रात वाघाचा मुक्त संचार हा या वनक्षेत्राचे व येथील परिसंस्थेचे महत्व विषद करतो. डोलारखेडा गावाच्या दक्षिणेस पूर्णा नदी वाहते. नदीकिनारी असलेल्या वेडी बाभुळ व बेशरमी या वनस्पतींचे अधिक्य दिसून येते. या वनस्पतींच्या दाट झाडोऱ्यामुळे अनेक सस्तन प्राण्यांना सुरक्षा देणारा अधिवास निर्माण झाला आहे. परंतु याभागात तरोटा व दर्पतुळस या विध्वंसक वनस्पतींनी वनक्षेत्रावर आक्रमण केले आहे. त्यामुळे येथील भक्ष्य-भक्षक साखळी बाधित झाली आहे. परिणामी तृणभक्षी प्राण्यांचे अन्नासाठी शेती, लागवडीखालील क्षेत्रावरील अवलंबित्व वाढले आहे. त्यातून मानव वन्यजीव संघर्ष घडून येण्याची शक्यता असते. तसेच या भागातील वाघांना देखील पूर्णा व तापी काठच्या शेतांमध्ये आसरा घ्यावा लागत आहे.

डोलारखेडा वनक्षेत्रात प्रामुख्याने आढळणारे वन्यप्राणी

या वनक्षेत्रात वाघ, बिबट, तडस, लांडगे, कोल्हे, रानगवा, पाणमांजर, अस्वल, नेवरा, उदमांजर, खोकड यासारख्या मांसाहारी प्राण्यांसोबतच चितळ, चिंकारा, काळविट, नीलगाय, रानडुक्कर, भेकर, चौशिंगा यासारखे तृणभक्षी विपुल प्रमाणात आढळतात. संपूर्ण महाराष्ट्रात डोलारखेडा हे छोटेसे गाव येथे आढळणाऱ्या वाघांमुळे प्रसिद्ध आहे. येथील वाघांनी उन्हाळ्यात तीव्र उन्हापासुन रक्षणासाठी केळीच्या बागांमध्ये आश्रय शोधला आहे. यामुळे येथील वाघांना बनाना टाइगर किंवा बागायती वाघ हे नवीन संबोधन प्राप्त झाले आहे. डोलारखेड्याच्या शिवारातील वाघ व इतर प्राण्यांची घनता ही लक्षणीय आहे. त्यामुळे हे छोटेखानी खेडे वाघांचे गाव म्हणुन विकसित होण्यास वाव आहे. त्यासोबतच डोलारखेडा वनक्षेत्र हे पुर्वेकडे अंबाबरुवा अभयारण्य व पश्चिमेकडे रावेर वनक्षेत्राला जोडले असल्यामुळे वाघांच्या सातपुडा संचारमार्गाचा महत्वाचा भाग आहे. या वनक्षेत्राला अधिक सुविधा प्राप्त झाल्यास वाघांचा हा महत्वाचा संचारमार्ग सुरक्षित होइल.

कोट..

हे वनक्षेत्र जैवविविधता संपन्न असूनही या भागाकडे वन्यजीव अधिवास विकास व वनपर्यटनास वाव असून, देखील त्या अनुषंगाने आम्ही गेल्या १० वर्षांपासून प्रयत्नशील आहोत. वन्यजीव संरक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवत दिल्ली पर्यंत निवेदने दिली आहेत. परंतु राज्यशासन स्तरावर विशेष प्रयत्न होताना दिसत नाहीत.

- बाळकृष्ण देवरे , सदस्य वन्यजीव संरक्षण संस्था,

आम्ही वरील प्रस्ताव राज्यशासनास पाठवला आहे. प्रस्तावाचा विचार करून आणि दुर्मिळ संकट ग्रस्त प्राणी, पक्ष्यांचा अधिवास बघता डोलारखेडा वनक्षेत्रास संकटग्रस्त वन्यजीव अधिवास क्षेत्र म्हणून घोषित केल्यास मुक्ताई भवानी व्याघ्र संवर्धन क्षेत्रास अधिक बळकटी येईल.

- रवींद्र फालक, मानद वन्यजीव रक्षक, वनविभाग जळगाव जिल्हा

या क्षेत्रास अधिक सुरक्षा प्रदान करुन वन्यजीव अधिवास विकास व पर्यटनास चालना दिल्यास मानव-वन्यजीव संघर्ष, वनविभागाचा पिक नुकसानी वर होणारा प्रचंड खर्च, त्याभागातील तरुणांची बेरोजगारी यासारख्या अनेक समस्यांचे निराकरण करता येइल. सद्यस्थितीत त्या भागातील वाघाच्या सुरक्षेची यंत्रणा तोकडी असुन ती अधिक भक्कम करण्याची नितांत आवश्यकता आहे.

- लक्ष्मीनारायण सोनवणे, अभ्यासक, वन्यजीव संरक्षण संस्था, सदस्य ,सातपुडा व्याघ्र संचारमार्ग समिती

Web Title: Wildlife enthusiasts rush to declare Dolarkheda Forest Critical Wildlife Habitat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.