हुडकोपोटी राज्य शासनाने भरलेली रक्कम माफ होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:12 AM2021-07-10T04:12:28+5:302021-07-10T04:12:28+5:30

एकनाथ शिंदे आज घेणार मनपात आढावा बैठक : १०० कोटींवरील स्थगितीसह आकृतीबंधाचाही प्रश्न मार्गी लागेल लोकमत न्यूज नेटवर्क ...

Will the amount paid by the state government be waived? | हुडकोपोटी राज्य शासनाने भरलेली रक्कम माफ होणार?

हुडकोपोटी राज्य शासनाने भरलेली रक्कम माफ होणार?

Next

एकनाथ शिंदे आज घेणार मनपात आढावा बैठक : १०० कोटींवरील स्थगितीसह आकृतीबंधाचाही प्रश्न मार्गी लागेल

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महापालिकेच्या ऐतिहासिक सत्तांतरामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडणारे शिवसेनेचे नेते तथा राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे शनिवारी जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात दुपारी १ वाजता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महापालिकेत आढावा बैठक होणार असल्याची माहिती शिवसेनेकडून देण्यात आली आहे. या बैठकीत हुडकोचे कर्ज भरल्याप्रकरणी राज्य शासनाचे मनपावर असलेले सुमारे ७१ कोटींची कर्ज माफ होण्याची घोषणा नगर विकास मंत्र्यांकडून होण्याची शक्यता असून, यासह १०० कोटींच्या निधीवरील स्थगिती उठविण्याबाबत देखील नगर विकास मंत्री घोषणा करण्याची शक्यता आहे.

मार्च महिन्यात झालेल्या महापौर व उपमहापौरांच्या निवडणुकीत भाजपचे संपूर्ण बहुमत असताना शिवसेनेने भाजपचे तब्बल २७ नगरसेवक फोडून महापालिकेवर पहिल्यांदाच शिवसेनेचा भगवा फडकावला होता. या सत्तांतरामध्ये नगर विकास मंत्री एकमेव शिंदे हेच ‘किंगमेकर’ होते. महापालिकेतील या ऐतिहासिक विजयानंतर एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच जळगाव शहरात येणार असून, महापालिकेत देखील ते बैठक घेणार आहेत.

राज्यातील सत्तेचा लाभ मनपाला होईल का?

महापालिकेचे नेहमीचे एक दुर्भाग्य राहिले आहे की, ज्या पक्षाची सत्ता महापालिकेत असते तो पक्ष राज्यात मात्र विरोधात असतो. २०१८ मध्ये ते चित्र जळगावकरांनी बदलवून दाखवत राज्यात भाजपची सत्ता असताना महापालिकेत देखील भाजपची सत्ता आणली. राज्यातील सत्तेचा फायदा जळगावकरांना होईल अशी अपेक्षा होती, मात्र वर्षभरात मनपातील सत्ताधाऱ्यांना राज्याचा सत्तेचा फायदा करून घेता आला नाही. त्यात भाजपची राज्याची सत्ता देखील वर्षभरातच गेली. मात्र, आता पुन्हा राज्याची सत्ता व मनपाची सत्ता देखील शिवसेनेकडे असून, या सत्तेचा फायदा जळगावकरांना होईल का, असा प्रश्न निर्माण होत आहे. विशेष म्हणजे नगर विकास मंत्री हे सेनेचे असून, महापालिका देखील याच खात्यात येते, त्यामुळे एकनाथ शिंदे जळगावकरांच्या समस्या सोडविण्यासाठी काय घोषणा करतात, याकडे लक्ष लागले आहे.

अंतर्गत वादाबाबतही घेणार आढावा

महापालिकेत सत्ता आल्यासोबतच मनपात तर जिल्ह्यात जिल्हाप्रमुखांची नियुक्ती केल्यानंतर जिल्ह्यातील सेनेत अंतर्गत गटबाजी वाढली आहे. त्याचा फटका सेनेला आगामी काळात बसण्याची शक्यता आहे. तसेच जिल्ह्यातील सेनेचे पदाधिकारी देखील राज्यातील वरिष्ठ नेत्यांच्या वादात विभागले गेले आहेत. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे अंतर्गत कुरघोडी टाळण्यासाठी शिवसैनिकांना काय डोस देतात, याकडेही लक्ष लागले आहे.

Web Title: Will the amount paid by the state government be waived?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.