ऑक्सिजननिर्मितीत स्वयंपूर्ण होणार - गुलाबराव पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:15 AM2021-05-01T04:15:41+5:302021-05-01T04:15:41+5:30
जळगाव : कोरोनाची दुसरी लाट ओसरलेली नाही. त्यामुळे ऑक्सिजननिर्मितीत जिल्ह्याला स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे. सध्या रुग्णसंख्या स्थिर असली ...
जळगाव : कोरोनाची दुसरी लाट ओसरलेली नाही. त्यामुळे ऑक्सिजननिर्मितीत जिल्ह्याला स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे. सध्या रुग्णसंख्या स्थिर असली तरी ऑक्सिजनची निर्मिती महत्त्वाची आहे. त्यासाठी जिल्ह्यात १० निर्मिती प्रकल्पांची उभारणी केली जाणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला बोलताना गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, ‘यात भुसावळ, चाळीसगाव, अमळनेर, पारोळा, रावेर, भडगाव व धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालये, मोहाडी येथील महिला रुग्णालय आणि चोपडा मुक्ताईनगर आणि जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये एकूण १० ठिकाणी ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहेत. यासाठी ८ कोटी दोन लाख रुपयांच्या निधीला मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. या सर्व प्रकल्पांमधून तब्बल ३७०० एलपीएम क्षमतेइतका प्राणवायूनिर्मित होणार आहे. आपल्या सद्य:स्थितीतील गरजेपेक्षा हा जास्त आहे. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून आम्ही नियोजन करीत आहोत. यामुळे कोणत्याही आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी आपण सज्ज होणार आहोत.
सध्या रेमडेसिविरचा तुटवडा असला तरी जिल्ह्याला हाफकिनकडून सहा हजार व्हायल्स मिळणार आहेत त्याची ऑर्डर देण्यात आली आहे.
लसीकरणाबाबत बोलताना पाटील यांनी सांगितले की, नागरिकांना कोणताही त्रास न होता कोविडची लस मिळावी यासाठीचे नियोजन जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. जिल्ह्यात शक्य तितक्या लवकर लसीकरण सुरू व्हावे असा प्रयत्न आहे.
पाटील पुढे म्हणाले की, कोविडचा आपण आजवर अतिशय धईरोद)त्तपणे मुकाबला केला आहे. आता तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन प्रशासन तयारी करत आहे. त्याला सहकार्य करण्याची गरज आहे. सध्या नागरिकांनी शासनाने लावलेल्या निर्बंधांचे पालन करावे, तसेच यासोबत आपल्या नजीकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन नक्की लस घ्यावी, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.
महामारीतही पाणीपुरवठा सुरळीत
या संकटाच्या काळात राज्यात पाणीपुरवठा सुरळीत राहावा, तसेच कुणीही तहानलेले राहू नये यासाठी विभागामार्फत योग्य ते नियोजन करण्यात आले. प्रांताधिकाऱ्यांना टँकर्सचे अधिकार देण्यात आले आहेत. जिल्ह्यात जळगाव शहराला लागून असलेल्या वाघनगर परिसरासाठी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली आहे. याच प्रमाणे जिल्ह्यातील विविध गावांसाठी जल जीवन मिशनच्या माध्यमातून योजनांना गती देण्यात येणार आहे.
बियाणांची टंचाई भासणार नाही.
खरीप हंगामासाठी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आढावा बैठक बोलावली आहे. यात खते आणि बियाणांबाबतचे नियोजन केले जाईल. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खते आणि बियाणांची कोणतीही टंचाई भासणार नाही, याची ग्वाहीदेखील पालकमंत्री पाटील यांनी दिली.