गटनेता बदलाचा वाद जाणार न्यायालयापर्यंत ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:12 AM2021-07-09T04:12:50+5:302021-07-09T04:12:50+5:30
जळगाव : महापालिकेच्या भाजपच्या बंडखोर नगरसेवकांनी गटनेता व उपगटनेता ठरवल्यानंतर या निर्णयाला महापाैर जयश्री महाजन यांनी मान्यता दिली ...
जळगाव : महापालिकेच्या भाजपच्या बंडखोर नगरसेवकांनी गटनेता व उपगटनेता ठरवल्यानंतर या निर्णयाला महापाैर जयश्री महाजन यांनी मान्यता दिली आहे. याबाबत महापौरांनी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांना पत्र पाठवून भाजपच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीस मान्यता देण्यास हरकत नसल्याचे कळवले आहे. तसेच दोन्ही पदाधिकाऱ्यांना याेग्य सवलती व अधिकार देण्याचे या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे आता हा वाद न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.
भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी महापौर व आयुक्तांना पत्र लिहून बंडखोरांच्या नेमणुकीला परवानगी देऊ नये असे म्हटले होते. मात्र महापौर जयश्री महाजन यांनी नवीन नियुक्त्यांना परवानगी दिली आहे. त्यामुळे भगत बालाणी यांचे अधिकार संपुष्टात येणार असल्याने गटनेत्याचा वाद आता थेट विभागीय आयुक्त व न्यायालयापर्यंत पाेहोचण्याची शक्यता आहे. भाजपच्या ५७ नगरसेवकांमध्ये फूट पडल्यानंतर बंडखाेर २७ नगरसेवकांच्या मदतीने शिवसेनेने भाजपच्या ताब्यातील सत्ता काबीज केली. बंडखाेरांची संख्या आता ३० वर पाेहोचली आहे. दरम्यान गेल्या आठवड्यात सभागृह नेते ललित काेल्हे यांनी भाजपच्या नगरसेवकांची बैठक बाेलावली हाेती. या बैठकीला २९ नगरसेवक उपस्थित हाेते. या नगरसेवकांनी एकमताने भाजपचा गटनेता बदलाचा निर्णय घेतला. त्यात गटनेतेपदी ॲड. दिलीप पाेकळे व उपगटनेतेपदी चेतन सनकत यांची निवड केली आहे. या निवडीचे पत्र देखील महापाैर जयश्री महाजन यांना दिले हाेते. या पत्राच्या अनुषंगाने महापाैर महाजन यांनी ७ जुलै राेजी आयुक्तांना स्वतंत्र पत्र लिहिले आहे. यात भाजपच्या ५७ पैकी २९ नगरसेवकांनी लाेकशाही पद्धतीने मनपातील भाजप गटनेता बदलाचे कळवले आहे. यात ॲड. पाेकळे व सनकत यांची गटनेता व उपगटनेतापदी नियुक्तीस मान्यता देण्यास हरकत नाही. त्यामुळे त्यांना मान्यता देण्यात यावी तसेच यापुढील गटनेता व उपगटनेता म्हणून त्यांना याेग्य त्या सवलती व अधिकार देण्यात यावे असे कळवले आहे.