कोरोनाच्या आपत्तीला आता तरी आळा बसेल का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:25 AM2021-02-23T04:25:26+5:302021-02-23T04:25:26+5:30
पाच महिन्यांपासून संसर्ग कमी होऊन कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला. हा दिलासा मिळत असतानाच गर्दी ...
पाच महिन्यांपासून संसर्ग कमी होऊन कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला. हा दिलासा मिळत असतानाच गर्दी वाढू लागल्याने व नियमांचे पालन होत नसल्याने कोरोनाने पुन्हा आता डोके वर काढले आहे. त्यामुळे पुन्हा आता जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना सुरू झाला आहेत. यात पाच ते सहा दिवसांपासून आवाहन केले जात आहे, मात्र लग्नांच्या ठिकाणी गर्दी टाळावी, मास्कचा वापर करावा अशा साध्या-साध्या नियमांचे पालन होत नसल्याने गेल्या वर्षाप्रमाणे आता पुन्हा आदेशांचे सत्र सुरू झाले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन उपाययोजना करीत असले तरी नियमांचे पालन होत नसल्यास उपाययोजनांचा उपयोग होणार कसा, असा सवाल उपस्थित होत आहे. प्रशासन उपाययोजना करीत असल्याने आता तरी नागरिकांची साथ मिळून कोरोनाच्या आपत्तीला आळा बसू शकेल की नाही, हे नियम पाळण्यावरच अवलंबून राहणार आहे. जिल्ह्यात लग्नाच्या ठिकाणी गर्दी होऊ लागल्याने व कोरोनाचे गांभीर्य नसल्याने रविवारी तर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी स्वत: रस्त्यावर उतरून धडक कारवाईचे सत्र सुरू केले. यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चाप बसू शकेल. जिल्हाधिकारी अॅक्शन मोडमध्ये आल्यामुळे आता आदेशांचेही सत्र सुरू झाले असून या पाठोपाठ आता कठोर प्रशासकीय उपाययोजना जाहीर केल्यामुळे कोरोनाच्या आपत्तीलाही आळा बसू शकतो, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.