नियमित निधीसह समर्पित निधीची करणार मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:16 AM2021-05-08T04:16:36+5:302021-05-08T04:16:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मतदारसंघाच्या विकासासाठी मिळणारा आमदार निधी खर्च न झाल्याने २०२०-२१ या आर्थिक वर्षातील समर्पित झालेला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मतदारसंघाच्या विकासासाठी मिळणारा आमदार निधी खर्च न झाल्याने २०२०-२१ या आर्थिक वर्षातील समर्पित झालेला निधी, तसेच २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी नियमित निधीची मागणी शासनाकडे करण्यात येणार आहे. यामध्ये समर्पित झालेला २१ कोटी ८५ लाख रुपयांच्या निधीसह ३६ कोटींचा नियमित निधी, असा एकूण ५७ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी जिल्ह्यासाठी उपलब्ध होऊ शकतो.
जिल्ह्यातील ११ मतदारसंघांसह विधान परिषदेच्या सदस्यांना मिळालेला आमदार निधी खर्च न झाल्याने आर्थिक वर्ष संपल्याने निम्म्याहून अधिक निधी समर्पित करावा लागला. याविषयी लोकमतने ‘निधी खर्चातही हात आखडता’ या मथळ्याखाली आमदार निधीच्या खर्चाविषयीचे सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते.
या वृत्तानंतर सर्वांत कमी खर्च झालेल्या भुसावळ मतदारसंघात सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली. विरोधकांनी ‘लोकमत’च्या वृत्ताचे कात्रण सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यानंतर आमदार संजय सावकारे यांच्या समर्थकांनीदेखील निधीची गोळाबेरीज मांडली.
विरोधकांच्या टीकेने ढवळून निघाले वातावरण
जिल्हाभरातील आमदारांच्या निधीच्या खर्चाची टक्केवारी प्रकाशित करण्यासह कोरोनामुळे परिणाम होऊन यंत्रणांनी मागणी न केल्याने निधी खर्च होऊ शकला नाही व तो समर्पित करावा लागल्याचे वृत्त प्रकाशित करण्यात आले. वृत्त प्रकाशित होताच भुसावळात विरोधकांनी टीका सुरू केली. त्यामुळे आमदार संजय सावकारे यांनीदेखील जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन निधीच्या खर्चाविषयी आपण पत्र दिलेले असून, निधी खर्चास प्रशासकीय मंजुरीदेखील मिळाली आहे, असे पत्रात नमूद केले.
नियमित व समर्पित निधीची मागणी
२०२०-२१ या वर्षातील समर्पित निधीसह २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या नियमित निधीची मागणी शासनाकडे करण्यात येणार आहे.