एकनाथ खडसेंना मंत्री करणार का?; मुख्यमंत्र्यांनी दिले वेगळेच संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 11:25 AM2019-08-24T11:25:13+5:302019-08-24T11:25:23+5:30
माजी मंत्री एकनाथ खडसे हे आमचे ज्येष्ठ नेते आहे. त्यांना राज्यात ठेवायचे का? केंद्रात पाठवायचे? यासंदर्भातील निर्णय केंद्रीय नेते घेतील,
भुसावळ (जळगाव) - भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची नाराजगी महाराष्ट्राला परिचीत आहे. पक्षातील ज्येष्ठ नेते असूनही त्यांना डावलून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केल्यामुळे एकनाथ खडसेंच्या मनातील खदखद अनेकदा मीडियासमोर आली आहे. तर, भूखंड घोटाळ्यात नाव आले. तसेच, कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम यांच्याशीही खडसेंचे संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे खडसेंचे मंत्रीपदही काढून घेण्यात आले होते. मात्र, भूखंड घोटाळ्यातून क्लिन चीट मिळाल्यानंतर पुन्हा एकदा खडसेंना मंत्रीपद देण्यात येईल, अशी चर्चा होती.
मंत्रिमंडळ विस्तारात खडसेंना मंत्रीपद देण्यात येणार, अशी चर्चा होती. मात्र, त्यावेळीही त्यांना मंत्रीपदाच्या खुर्चीपासून दूर ठेवण्यात आले. पण, मीच केवळ 6 महिन्यांच्या मंत्रीपदासाठी इच्छुक नसल्याचं खडसेंनी म्हटलं होता. त्यानंतर, भुसावळ येथील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी खडसेंबाबत वेगळेच संकेत दिले आहेत.
माजी मंत्री एकनाथ खडसे हे आमचे ज्येष्ठ नेते आहे. त्यांना राज्यात ठेवायचे का? केंद्रात पाठवायचे? यासंदर्भातील निर्णय केंद्रीय नेते घेतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. खडसे यांना आगामी निवडणुकीत युतीची सत्ता आली तर मंत्रिमंडळात घेण्यात येईल का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता. महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने भुसावळ येथे आलेल्या मुख्यमंत्र्यांनी खडसेंच्या प्रश्नावर उत्तर देताना वेगळेच संकेत दिले आहेत. त्यामुळे खडसेंना राज्यसभेवर पाठविण्यात येऊ शकते. राज्यसभेवर घेऊन खडसेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपाच्या केंद्रीय नेत्यांकडून केला जाऊ शकतो. तर, राज्यातील विधानसभा निवडणुकांवेळी खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे रोहिणी खडसेंना विधानसभेचं तिकीट देऊन खडसेंची नाराजी चांगलीच दूर करण्याचा प्रयत्न भाजपाचा आहे. दरम्यान, मी पक्षाकडे विधानसभेलाच उमेदवारीची मागणी करणार आहे, असं एकनाथ खडसेंनी यापूर्वी म्हटलं आहे. यावरुन, खडसे राज्यातच राहण्यास उत्सुक असल्याचं दिसून येतं.