बिबट्यांच्या होणाऱ्या मृत्यूबाबत वन विभाग गंभीर होणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:21 AM2021-07-07T04:21:07+5:302021-07-07T04:21:07+5:30

अजय पाटील लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव -जंगलामध्ये वाढत जाणाऱ्या अतिक्रमणामुळे वन्यजीव नागरीवस्तीमध्ये शिरण्याच्या घटना वाढत असून, यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष ...

Will the Forest Department be serious about leopard deaths? | बिबट्यांच्या होणाऱ्या मृत्यूबाबत वन विभाग गंभीर होणार का?

बिबट्यांच्या होणाऱ्या मृत्यूबाबत वन विभाग गंभीर होणार का?

Next

अजय पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव -जंगलामध्ये वाढत जाणाऱ्या अतिक्रमणामुळे वन्यजीव नागरीवस्तीमध्ये शिरण्याच्या घटना वाढत असून, यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष वाढत आहे. त्यात मानवाकडून वन्यजीवांना ठार मारण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जात असून, जळगाव तालुक्यातच गेल्या सहा महिन्यात एकूण ३ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे; मात्र याप्रकरणी वन विभागाकडून कोणतेही ठोस कारण देण्यात आले नसून, दोषींवरदेखील कारवाईबाबत वन विभाग लक्ष द्यायला तयार नाही.

सोमवारी तालुक्यातील विटनेर वनक्षेत्रातील कम्पार्टमेंट ४३८ मध्ये एक बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. या बिबट्याने मृत नीलगाय खाल्ल्याने विषबाधा होऊन बिबट्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वन विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. याआधी याच भागात डिसेंबर महिन्यात एका मादी बिबट्याचा मृत्यू झाला होता. तर जानेवारी महिन्यात ममुराबाद शिवारातदेखील एका बिबट्याचा मृतदेह आढळून आला होता. विशेष म्हणजे ममुराबाद शिवारातील बिबट्या अन्य भागात मारून, त्याचा मृतदेह या शिवारात आणून फेकला होता. त्या बिबट्यावरदेखील विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वन विभागाने वर्तविला होता. बिबट्यांवर विषबाधासारखे प्रयोग होत असताना, वन विभागाकडून असले प्रयोग रोखण्यास पूर्णपणे अपयश येत आहे.

तीन दिवसांपासून नीलगायचा मृतदेह पडून कसा राहतो?

विटनेर शिवारात बिबट्यांसह नीलगाय व इतर वन्यप्राणीदेखील आहेत. त्यानुसार वन विभागाकडून सुरक्षा पुरविणे गरजेचे आहे, तसेच नियमित जंगलात गस्त मारणेदेखील गरजेचे आहे. या जंगलात तीन दिवसांपासून एक नीलगायचा मृतदेह पडून असतो, त्या गायीचा मृतदेहावर विषप्रयोग केला जातो व त्या गायीचे मास खाल्ल्यामुळे बिबट्याचा मृत्यू होतो. जर वन विभागाने वेळीच गस्त करून, याकडे लक्ष दिले असते तर बिबट्याचा मृत्यू झालाच नसता. या भागातील वनरक्षक फिल्डवर जात नसल्याच्या तक्रारीदेखील प्राप्त होत आहेत. याबाबत चौकशी करण्याची मागणी वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्य बाळकृष्ण देवरे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे करणार तक्रार

बिबट्यांच्या मृत्यूला वन विभागाचा उदासीन कारभार जबाबदार असून, वन अधिकारी व कर्मचारी नियमित जंगलात गस्त करत नसल्याने या घटना वाढत असल्याने याबाबत संबंधित वन अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांबाबत वन्यजीव संरक्षण संस्थेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती वन्यजीव संरक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

व्हिसेरा मिळण्याची सहा महिन्यांची प्रतीक्षा

बिबट्याचा मृत्यू झाल्यानंतर मृत्यूचे कारण शोधण्यासाठी बिबट्याचा व्हिसेरा नाशिक येथे पाठविण्यात आला आहे. ममुराबाद येथे मृतावस्थेत आढळून आलेल्या बिबट्याच्या मृत्यूचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. सहा महिने होऊनदेखील व्हिसेराचा अहवाल प्राप्त झालेला नाही. अहवाल मिळण्यास होणाऱ्या उशीरबाबतदेखील लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Will the Forest Department be serious about leopard deaths?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.