व्यापारी संकूल सुरू न झाल्यास न्यायालयात जाणार - खासदार उन्मेष पाटील यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 12:34 PM2020-06-21T12:34:17+5:302020-06-21T12:34:59+5:30
संकुले सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात अनलॉक-१मध्ये केंद्र सरकारने व्यापारी संकुले तसेच मॉल सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मात्र राज्य सरकारने त्यास नकार दिल्याने व्यापारी वर्ग त्रस्त झाला आहे, असा आरोप खासदार उन्मेष पाटील यांनी केला आहे. आता ही व्यापारी संकुले सुरू झाली नाही तर न्यायालयात जाऊ इशारादेखील त्यांनी दिला आहे.
शहरातील व्यापारी संकुले बंद असल्याने या संदर्भात चर्चा करण्यासाठी खासदार उन्मेष पाटील यांनी व्यापाऱ्यांसह जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला. ते म्हणाले की, केंद्र सरकारच्या ३० मे रोजीच्या आदेशानुसार प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणची व्यापारी संकुले तसेच मॉल सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र राज्य सरकारने त्यास नकार दिला. राज्यातील अनेक शहरांमधील ८० टक्के व्यापार संकुलांमध्ये आहे. यात जळगाव शहराचीही अशीच स्थिती आहे. येथील संकुलांमधील व्यापार बंद असल्याने ५० हजार नागरिकांचा रोजगार बुडत आहे. त्यामुळे ते निराशेच्या गर्तेत सापडले आहेत.
कोरोनाशी लढताना आर्थिक लढाईदेखील महत्त्वाची असल्याने शहरातील व्यापारी संकुले सुरू करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापनाचे सचिव किशोर राजे निंबाळकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली असून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले, अशी माहिती खासदार पाटील यांनी दिली. त्यामुळे ३० जूननंतर संकुले सुरू झाली नाही तर न्यायालयात जाऊ, असा इशाराही त्यांनी दिला.
राज्य सरकारच्या गलथान कारभारामुळे व्यापाºयांवर ही वेळ
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ९० दिवस व्यापार बंद ठेवला. त्या वेळी योग्य उपाययोजना झाल्या नाही व राज्य सरकारच्या या गलथान कारभारामुळेच रुग्णांची संख्या वाढली व व्यापाºयांवर आता व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ आली, असा आरोपही खासदार पाटील यांनी केला.