आघाडी व युतीचा धर्म पाळला जाईल का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 11:35 AM2019-03-16T11:35:18+5:302019-03-16T11:35:39+5:30
गेल्या निवडणुकीतील पुनरावृत्ती टाळण्यासाठी काँग्रेस व भाजप दक्ष
मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यात आमदारकी भाजप अर्थात गावीत गटाकडे तर नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्था या रघुवंशी अर्थात काँग्रेस गटाकडे अशी राजकीय स्थिती गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. लोकसभेसाठी राजकीय गणिते बदलली असून पालिका निवडणुकीत काँग्रेस व शिवसेनेची झालेली युती आता दुभंगली आहे. भाजप-सेना एकत्र आली असली तरी मने जुळणे आवश्यक आहे. दुसरीकडे राष्टÑवादी खुल्या दिलाने काँग्रेसला कशी आणि कोणती मदत करते याकडे देखील लक्ष लागून राहणार आहे.
नंदुरबार तालुका नवापूर आणि नंदुरबार अशा दोन विधानसभा मतदारसंघात विभागला गेला आहे. तालुक्यातील सहा महसूल मंडळांपैकी दोन महसूल मंडळे हे नवापूर मतदारसंघात येत असल्यामुळे तालुक्यातील राजकीय समिकरणे नेहमीच दोलायमान असतात. सद्य स्थितीचा विचार करता नगरपालिका व पंचायत समिती काँग्रेसकडे आहेत. पालिका निवडणुकीत काँग्रेस-शिवसेना युती चर्चेची ठरली होती. जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टीने देखील या युतीने तयारी चालविली होती. परंतु लोकसभेला भाजप-सेना युती झाल्यामुळे आता सेनेला पक्ष आदेशामुळे काँग्रेसची साथ सोडावी लागणार असून भाजपच्या दृष्टीने ती जमेची बाजू ठरणार आहे.
मने जुळतील का?
काँग्रेस व भाजपकडून अद्याप कुणालाही उमेदवारी जाहीर झालेली नसली तरी दोन्ही पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. घटक पक्षांना एकत्र करणे, चर्चा करणे, विविध माध्यमातून एकत्र येणे असे प्रकार काँग्रेस, भाजपमध्ये सुरू आहे. वरिष्ठ पातळीवर काँग्रेस-राष्टÑवादी आघाडी व भाजप-सेनेची युती झाली आहे. दोन्ही पक्षांनी कामाला सुरुवात केली आहे. भाजप-सेनेने संयुक्त मेळावा व पत्रकार परिषद घेवून ‘झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे...’ या उक्तीप्रमाणे कामाला सुरुवात देखील केली आहे. दोन्ही पक्षांमध्ये पाच वर्ष विस्तवही जात नव्हता. पालिका निवडणुकीत दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले होते. काँग्रेसच्या साथीने चार नगरसेवक सेनेचे निवडून आले होते. आता एकदिलाने काम करण्याची घोषणा केली असली तरी कार्यकर्त्यांची मने जुळली जातील का? हा प्रश्न कायम राहणार आहे.
राष्टÑवादीची साथ
दुसरीकडे काँग्रेस व राष्टÑवादी यांची आघाडी देखील एकदिलाने काम करणार असे म्हणत आहे. गेल्या निवडणुकीत राष्टÑवादीचे बरेच पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपकडे होते. अर्थात आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांना मानणारा वर्ग या पक्षात असल्यामुळे ते चित्र यंदाही कायम राहते किंवा कसे याकडे लक्ष लागून राहणार आहे.
काँग्रेसचा कार्यकर्त्यांवर भर
काँग्रेसकडे असलेली नगरपालिका, पंचायत समिती, बाजार समिती, शेतकरी सहकारी संघ या संस्थांच्या बळावर काँग्रेस तालुक्यात आघाडी घेण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. परंतु जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी प्रचारात सक्रीय राहणार नसल्याचा फटका सहन करावा लागणार आहे.
एकुणच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची ही एक प्रकारे रंगीत तालीमच राहणार आहे. यामुळे पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते यांना एकसंघ ठेवणे व त्यांना उत्साहित करण्यासाठी आघाडी व युतीतील घटक पक्ष कामाला लागले आहेत.