निवृत्ती वेतनासाठीची फिराफीर थांबणार का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 12:26 PM2019-06-08T12:26:10+5:302019-06-08T12:27:54+5:30
निवृत्ती वेतन न मिळाल्याने सेवानिवृत्तांचे हाल
महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या सेवानिवृत्त शिक्षकांचे २०१६ मधील दोन व या वर्षाचे पाच महिन्यांचे निवृत्ती वेतन न मिळाल्याने सेवानिवृत्तांचे हाल होत आहेत. त्यामुळे या निवृत्तांना त्यांचे हक्काचे निवृत्ती वेतन कधी मिळेल व त्यासाठी कोणी लक्ष देईल का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. महानगर पालिका शिक्षण मंडळाच्या निवृत्त झालेल्या निवृत्तीवेतन धारकांना २०१६ मधील नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांचे थकीत निवृत्तीवेतन अडीच वर्षे उलटले तरी देण्यात आलेले नाहीत़ याबाबत वारंवार तक्रार करूनही त्या बाबत कोणी दखल घेत नाही. विशेष म्हणजे या संदर्भातील सर्व बाबी गुलदस्त्यात असून याबाबत संबधितांनी कधीही खुलासा केलेला नाही़ तीन वर्षापूर्वीचे दोन महिन्यांचे निवृत्ती वेतन थकलेले असताना २०१९ यावर्षातही पाच महिन्यांपासून संबंधितांना निवृत्तीवेतन मिळालेले नाही. याबाबतही तक्रार करण्यात आली. मात्र त्या बाबत कोणतेच उत्तर दिले जात नाही. एक प्रकारे याद्वारे निवृत्तीवेतन धारक शिक्षकांची पिळवणूक सुरू आहे. यासंदर्भात राज्यपालांना निवेदनही देण्यात आले असून या सर्व प्रकाराची उच्चस्तरिय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशा प्रकाराला पायबंद घालून सेवानिवृत्त शिक्षकांना त्वरित निवृत्ती वेतन देण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी निवृत्तांची आहे. निवृत्त शिक्षकांबाबत इतकी उदासीनता दाखविली जात असल्याने त्यांच्या सेवेचे हेच मोल म्हणावे का, अशीही भावना निवृत्तांच्या मनात निर्माण झाली आहे. शहरवासीयांकडे कराची रक्कम थकली तर त्यांच्याकडून व्याज वसूल केले जाते. आता निवृत्त शिक्षकांना तीन वर्षांपासून त्यांचे वेतन मिळत नसल्याने त्यांनाही व्याज मिळेल का, असाही सवाल उपस्थित होत आहे.
- मुनाफ शेख, सेवानिवृत्त शिक्षक प्रतिनिधी, मनपा शिक्षण मंडळ