सबळ पुराव्यानिशी दोषारोप सादर करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 11:07 PM2020-10-22T23:07:01+5:302020-10-22T23:07:17+5:30
रावेर हत्याकांड : जिल्हा पोलीस अधीक्षक मुंढे यांची माहिती
रावेर : सबंध देशभरात घडलेल्या अत्यंत संवेदनशील गुन्ह्यांपैकी कमालीची गंभीरता असलेल्या पिडीतेसह चौघा बालकांच्या हत्याकांडाच्या गुन्ह्य़ात आरोपी महेंद्र सिताराम बारेला (वय १९ वर्षे) रा. केऱ्हाळे बुद्रुक ता. रावेर यास पोलिसांना अटक करण्यात यश आले आहे. सदरच्या गुन्ह्यात सदर आरोपीचा १०० टक्के सहभाग असल्याचे शास्त्रीय पुरावे प्राप्त झाले आहेत. ६० दिवसांपुर्वी सर्वपुराव्यांनिशी न्यायालयात या गुन्ह्यातील दोषारोप ठेवणार असून या गुन्ह्यात आरोपीला निश्चित सजा होणार असल्याचा आत्मविश्वास पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत प्रकट केला.
रावेर शिवारातील बोरखेडा रस्त्यालगत असलेल्या १४ वर्षीय पिडीतेसह तिच्या चौघा भावंडांची बालहत्याकांडातील गुन्ह्याच्या तपासाबाबत आयोजित पत्रकार परिषदेत मुंढे बोलत होते.
सामुहिक बलात्काराचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केला असता, या तपासाला बाधा निर्माण होईल, अशा प्रकारची तपासातील माहिती या गुन्ह्याचे दोषारोप न्यायालयात दाखल होईपर्यंत आपणासमोर उघड करता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान मयतांमधील बालिकेवर अत्याचार झाल्याबाबत कोणताही वैद्यकीय पुरावा तपासात निष्पन्न झाला नसल्याची बाब निश्चित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर आरोपीस शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.