गोलाणी मार्केटच्या गच्चीवरील पावसाचे वाया जाणारे पाणी वाचविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 01:18 PM2019-07-08T13:18:11+5:302019-07-08T13:19:07+5:30
जल फाउंडेशनचा पुढाकार : रेन वॉटर हार्वेस्टींग सिस्टम केली जातेय कार्यान्वित
जळगाव : पावसाच्या पाण्याची बचत व्हावी यासाठी शहरातील ‘जल फाउंडेशन’ व्दारे गोलाणी मार्केटच्या गच्चीवर पडणारे पावसाचे पाणी वाचविले जाणार आहे. यासाठी संस्थेकडून ‘रेन वॉटर हावेस्टींग सिस्टम कार्यान्वित केली जात असून, यासाठी मार्केट परिसरात चार शोषखड्डे खोदण्यात आले असल्याची माहिती स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे यांनी दिली.
मराठे यांनी आवाहन केल्यानंतर शहरातील काही संस्था विविध भागातील इमारतींवरून वाहून जाणारे पाणी वाचविण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टींग बसविण्यासाठी पुढे आल्या आहेत. गोलाणी मार्केट हे शहरातील सर्वात मोठे मार्केट आहे. मुसळधार पावसाचे मार्केटच्या गच्चीवर पडणारे लाखो लिटर पाणी हे वाहून जाते. यामुळे मराठे यांनी मनपात सामाजिक संस्थाची बैठक घेवून रेन वॉटर हार्वेस्टींग बसविण्यासाठी आवाहन केले होते.
चार ठिकाणी खोदण्यात आले शोषखड्डे
गोलाणी मार्केटमधील गच्चीची व्याप्ती खूप मोठी आहे. तसेच गच्चीवरील सर्व पाणी एकाच ठिकाणी उतरविणे शक्य नाही. त्यामुळे जल फाउंडेशनच्या सदस्यांनी मार्केटच्या चारही बाजूने चार शोषखड्डे तयार केले आहेत. पाईपांव्दारे हे पाणी या शोषखड्डयापर्यंत आणले जाणार आहे. त्यात हे पाणी झिरपणार आहे. जल फाउंडेशनच्या या उपक्रमासाठी मनपाकडून जेसीबी देण्यात आले.
मनपाचे पाणी देखील गोलाणीच्या गच्चीवर आणले जाईल
याशिवाय मनपाच्या इमारतीवरील पाणी गोलाणी मार्केटच्या गच्चीवर आणून हे पाणी वाचविण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी मपनाच्या गच्चीचा उत्तार एकाच बाजूला केला जाणार किंवा पाईपच्या माध्यमातून पावसाचे पाणी गोलाणी मार्केटच्या गच्चीवर उतरविण्याचा प्रयत्न आहे.