विधान परिषद : 'युती' तोडणाऱ्या खडसेंना शिवसेना खरंच मतदान करणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 06:12 PM2022-06-18T18:12:42+5:302022-06-18T18:13:03+5:30

महाविकास आघाडीचे उमेदवार खडसेंची वाट बिकट?

Will Shiv Sena really vote for ncp eknath Khadse who breaks alliance with shiv sena political scenario see what will happen | विधान परिषद : 'युती' तोडणाऱ्या खडसेंना शिवसेना खरंच मतदान करणार का?

विधान परिषद : 'युती' तोडणाऱ्या खडसेंना शिवसेना खरंच मतदान करणार का?

Next

प्रशांत भदाणे
विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगानं सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून येतंय. राज्यसभेप्रमाणे या निवडणुकीतही महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशीच लढत आहे. राज्यसभेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून महाविकास आघाडी समोर भाजपचं आव्हान तर आहेच पण त्यासोबतच स्वकियांमधील मतभेदाचं मोठं आव्हान महाविकास आघाडीला पेलावं लागणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंना स्वकियांकडून दगाफटका होण्याची भीती आहे. खडसे महाविकास आघाडीचे उमेदवार असले तरी त्यांना शिवसेनेची मते मिळणार का? हा खरा प्रश्न आहे. कारण भाजप सेनेतील युती तोडल्याचा राग... आणि इतिहासातील काही गोष्टींचा राग आजही शिवसैनिकांच्या मनात आहे. त्यामुळं विधान परिषदेचा कोण गुलाल उधळणार हे पाहणं महत्त्वाचं असेल

एकनाथ खडसे, भाजप सोडून राष्ट्रवादीत आलेले उत्तर महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत. राष्ट्रवादीत आल्यावरही राजकीय पुनर्वसनासाठी त्यांची धडपड सुरु आहे. राष्ट्रवादीनं आता त्यांना विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारी दिली खरी, पण खडसे सहज आमदार होतील, अशी स्थिती नाहीये. राष्ट्रवादीत आल्यापासून भाजप खडसेंच्या निशाण्यावर आहे. त्यामुळं खडसेंना रोखण्यासाठी भाजप फिल्डिंग लावेल, यात शंका नाही. दुसरीकडं खडसेंनी आमदार व्हावं हे जळगाव जिल्ह्यातील स्वकियांनाच रुचणारं नाही. आता हे स्वकीय कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी इतिहासाची पाने चाळली तर ती नावे समोर येतील. पालकमंत्री गुलाबराव पाटील, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील या नेत्यांचे खडसेंसोबत कायमच हाडवैर राहिलं आहे. या इतिहासाचा परिणाम खडसेंच्या बाजूने असेल की विरोधात हे पुढच्या दोनच दिवसात स्पष्ट होणार आहे.

यापूर्वी राज्यात भाजप सेनेची युती होती. असं असताना जळगावात मात्र, गुलाबराव पाटील आणि चंद्रकांत पाटलांसोबत खडसेंचं हाडवैर होतं, ते आजही कायम आहे. खडसे कृषिमंत्री असताना गुलाबराव पाटलांनी त्यांच्यावर शासकीय अनुदान लाटल्याचा आरोप केला होता. त्यामुळं गुलाबराव पाटलांवर त्यांच्या मुलाच्या हळदीच्या दिवशीच, खडसेंनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. एवढंच नाही तर आईचं निधन झालं तेव्हाही गुलाबराव पाटील तुरुंगात होते. दुसरीकडं चंद्रकांत पाटील हे सुरुवातीपासून खडसेंशी संघर्ष करत आहेत. हा इतिहास असताना हे दोन्ही नेते खडसेंच्या पदरात आपलं मत टाकतील का? हा खरा प्रश्न आहे. विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांचं अलीकडे भाजप नेते गिरीश महाजनांशी चांगलं ट्युनिंग जमतं, त्यामुळं खडसेंना मैदान मारणं सोपं नाही हेही तितकंच खरं.

एकीकडं अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना विधानपरिषद निवडणुकीत मतदान करता येणार नाहीये. त्यामुळं राष्ट्रवादीची हक्काची दोन मतं कमी झाली आहेत, अशातच शिवसेनेची मतं मिळाली नाहीत तर खडसेंची वाट बिकट आहे, हे निश्चित.

Web Title: Will Shiv Sena really vote for ncp eknath Khadse who breaks alliance with shiv sena political scenario see what will happen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.