मनपा आयुक्तांना कायदा दाखवतोच- अंबादास दानवे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 04:58 PM2023-09-10T16:58:36+5:302023-09-10T16:58:54+5:30
केळी विकास महामंडळासाठी निधी दिला तरी कुठे?
जळगाव: शिवरायांसह सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी शासकीय सोपस्कार आटोपले आहेत. तरीही ‘प्रोटोकॉल’ दाखवत या कार्यक्रमाला विरोध करणाऱ्या मनपा आयुक्तांना सोमवारी कायदा दाखवतोच, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी इशारा दिला.
सरदार वल्लभभाई पटेल व शिवरायांच्या पुतळ्याच्या कार्यक्रमाला विरोधासाठी कट रचणाऱ्या ‘खोके’बाज हरामखोरांना अशा कार्यक्रमाला बोलवायचेच कशाला, असा सवालही त्यांनी केला. राज्य सरकारने जळगावसाठी केळी विकास महामंडळ मंजूर केले आहे. पण निधी दिला तरी कुठे, असा सवाल करीत पाडळसरे धरणाचाही प्रश्न सोडविण्यात अपयश आल्याचा आरोप त्यांनी केला. ‘घर घर जल’ म्हणत ग्रामीणपाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील योजना राबविताहेत.
मात्र त्यांच्या स्वत:च्या गावात पाणी नाही, अशी वस्तुस्थिती आहे. सारे ‘खाण्यासाठी’ चाललयं, असा आरोपही त्यांनी केला. तसेच गतकाळातल्या सरकारने कापूस उत्पादकांना न्याय देण्यासाठी १२ हजारांपर्यंत बाजार नेला होता. मात्र या करंटे सरकारने तो भाव ६-७ हजारांवर आणून ठेवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरात गेल्यावर्षीचा कापूस अजुनही पडून आहे. त्यामुळे तीन इंजिनचे सरकार शेतकरीविरोधी असल्याचा आरोप त्यांनी केला.
रविवार देतोय शुभसंकेत : संजय राऊत
आजचा दिवस शुभसंकेत देणारा ठरतो आहे. रविवारी शिवरायांसह सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. आग्र्याला निघालेल्या शिवरायांचा खान्देशभूमीतला मुक्काम विसरता येणार नाही. शिवरायांनी धरणगावच्या सांडेश्वर मंदिरात मुक्काम केला होता. शिवरायांनी दिलेली तलवार आजही शिवसेना जपून आहे. त्याच शिवरायांच्या आणि देशासाठी नेतृत्व करणाऱ्या सरदार पटेल यांच्या पुतळ्याच्या अनावरणाला विरोध करणाऱ्या ‘खोके’बाज ४ टकले विरोध करीत होते. मात्र आज त्या चारही जणांना धडकी भरली असेल. म्हणून आजचा दिवस शुभसंकेत देणारा असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.