सिंचन, रेल्वे व रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावणार - उन्मेष पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 12:39 PM2019-05-24T12:39:42+5:302019-05-24T12:40:15+5:30
विशेष मुलाखत
अजय पाटील
जळगाव : जळगाव लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला आहे. तो विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करणार असून, सिंचनाची कामे पूर्ण करून जळगाव लोकसभा मतदारसंघ सुजलाम-सुफलाम करण्याचा प्रयत्न राहणार आहे. रस्ते व रेल्वेचे प्रश्न देखील मार्गी लावणार असल्याचे विजयी उमेदवार उन्मेष पाटील यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
प्रश्न : कोणते मुद्दे आपल्या प्रचारात महत्वाचे ठरले की ज्यामुळे आपला विजय झाला ?
उत्तर : लोकसभेची निवडणूक ही स्थानिक मुद्यांपेक्षा राष्टÑीय मुद्यांवर लढवली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने देशाला मिळालेले मजबूत नेतृत्व व त्यांनी आपल्या कार्यकाळात सुरक्षित व मजबूत राष्टÑ म्हणून देशाला दिलेल्या ओळखीचाच मुद्दा व ‘सबका साथ सबका विकास’ चा मुद्दा नागरिकांना आवडला त्यामुळेच हा विजय झाला.
प्रश्न : आगामी पाच वर्षात कोणत्या प्रश्नांना महत्व देणार?
जळगाव शहराचा महत्वाचा प्रश्न म्हणजेच समांतर रस्त्याचा प्रश्न मार्गी लावणार. तसेच पाडळसरे धरणाला निधी मिळवून हे काम पूर्ण करणे व गिरणेवरील सात बलून बंधाऱ्याचे काम या पाच वर्षात करण्याचा प्रयत्न माझा राहणार आहे.
प्रश्न : निकालाबाबत आपल्याला काय वाटते?
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर जनतेला विश्वास होता. त्यामुळे माझा विजय होणारच होता. जलसंपदामंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे हे फळ आहे.