यावर्षी विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:17 AM2021-03-23T04:17:19+5:302021-03-23T04:17:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासनाकडून जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारा गणवेश यावर्षी बीएसआय दर्जाचे कापड न मिळाल्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासनाकडून जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारा गणवेश यावर्षी बीएसआय दर्जाचे कापड न मिळाल्याने वितरीत करण्यात आलेला नाही. त्यामुळे गणवेशासाठी देण्यात आलेला निधी पुन्हा शासनाकडे जमा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे यावर्षी विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात थांबल्यानंतर जानेवारी महिन्यात शाळा सुरू झाल्या. शिक्षणाची घडी बसत असतानाच पुन्हा कोरोनाचा उद्रेक वाढल्याने शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या. आता शैक्षणिक वर्ष संपत आले आहे. मात्र, विद्यार्थ्यांना अजूनही गणवेश मिळालेला नाही. जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी शासनामार्फत गणवेश योजना राबवली जाते. पहिली ते आठवीच्या सर्व मुली आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्र्य रेषेखालील मुलांनाही या योजनेचा लाभ दिला जातो. दरवर्षी दोन गणवेशांचे असे प्रत्येकी ३०० रुपयाप्रमाणे सहाशे रुपये दिले जात होते. शाळास्तरावरून गणवेश तयार करून दिले जातात. परंतु, यावर्षी कोरोनामुळे एकाच गणवेशाचा निधी देण्याचे धोरण शासनाने अवलंबले आहे.
कापड मिळेना : मार्गदर्शन मागवले
विद्यार्थ्यांना चांगला दर्जाचा गणवेश मिळावा, यासाठी शासनाने बीआयएस दर्जाचे कापड गणवेशासाठी वापरावे, असे आदेश दिले होते. यासाठी मंजूर निधीही शासनाकडून शाळांना वर्ग करण्यात आला होता. परंतु, बाजारात बीआयएस दर्जाचे कापड उपलब्ध झाले नाही. याबाबत शिक्षकांनी समग्र शिक्षा अभियान विभागाकडे तक्रार करून मार्गदर्शक सूचना मागवल्या होत्या. तसेच समग्र शिक्षण विभागानेही शासनाला पत्र पाठवून मार्गदर्शक सूचना मागवल्या होत्या. दरम्यान, कुठलेही मार्गदर्शन न मिळाल्याने अद्याप गणवेशाच्या कापडाची खरेदी झालेली नाही. त्यामुळे यावर्षी विद्यार्थ्यांवर गणवेशापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
अन्यथा निधी होऊ शकतो जमा
गणवेशासाठी वितरीत करण्यात आलेला निधी हा मार्चअखेर खर्च करणे अपेक्षित आहे. त्यामुळे निधी खर्च न झाल्यास तो पुन्हा जिल्हास्तरावर जमा केला जाऊ शकतो.
एकूण जिल्हा परिषद शाळा - १,८२७
एकूण मनपा शाळा - ३०
एकूण जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थी - १ लाख ८४ हजार
एकूण गणवेश लाभार्थी - १ लाख ५७ हजार