आज पाणी येणार का? मनपा फेसबुक, इन्स्टा, एक्सवरून माहिती देणार
By अमित महाबळ | Published: October 1, 2023 06:33 PM2023-10-01T18:33:55+5:302023-10-01T18:34:05+5:30
आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या संकल्पनेतून जळगाव शहर महानगरपालिका आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही सक्रिय झाली आहे.
अमित महाबळ, जळगाव : महानगरपालिकेतर्फे देण्यात येणाऱ्या सूचना, निवेदन आणि सेवांची माहिती तत्काळ जळगावकरांना मिळावी या उद्देशाने आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या संकल्पनेतून जळगाव शहर महानगरपालिका आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही सक्रिय झाली आहे.
जळगाव महानगरपालिकेतर्फे देण्यात येणाऱ्या सेवासुविधा, योजना, पाणीपुरवठा वेळापत्रकातील बदल आणि इतर सूचनांची माहिती नागरिकांना लागलीच मिळावी म्हणून महापालिकेच्या वतीने JCMC Digital या नावाने फेसबुक, एक्स (पूर्वीचे ट्विटर) आणि इन्स्टाग्रामवर अकाउंट सुरू करण्यात आले आहे. या खात्यांना लाइक व फॉलो करावे, ज्यामुळे माहिती लागलीच उपलब्ध होईल, असे आवाहन आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी केले आहे.
मनपाचे व्हॉट्सॲप चॅनेलही सुरू
महानगरपालिकेतर्फे अधिकृत व्हॉट्सॲप चॅनेलही सुरू करण्यात आले असून, त्यावरदेखील नागरिकांना माहिती उपलब्ध होणार आहे. या चॅनेलची लिंक मनपाच्या सोशल मीडिया खात्यांवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
स्वतंत्र टीममार्फत व्यवस्थापन
महानगरपालिकेचे सोशल मीडिया खाते हाताळण्यासाठी एका टीमची व्यवस्था करण्यात आली असून, त्यांच्या मार्फत सोशल मीडिया खात्यांचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे.
अडचणी सोडविण्यासाठी माहितीपूर्ण व्हिडीओ
सोशल मीडियावर खाते उघडण्यासह दि. २ ऑक्टोबरपासून आणखी एका प्रोजेक्टचे लोकार्पण केले जाणार आहे. नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी माहितीपूर्ण व्हिडीओ प्रसारित केले जाणार आहेत.
जन्म दाखला, मृत्यू दाखला, बांधकाम परवानगी, नळ जोडणी आणि इतर कामांसाठी कोणत्या विभागात जावे, कोणती कागदपत्रे लागतात, शासकीय शुल्क याची माहिती देणारी व्हिडीओ शृंखला ‘आता मी काय करू?’चे लोकार्पण केले जाणार आहे.
महाराष्ट्रात आजपर्यंत कोणत्याही महानगरपालिकेने अशा प्रकारचे व्हिडीओ बनवलेले नाहीत. ५६ व्हिडीओच्या शृंखलेपैकी प्रथम १७ व्हिडीओ २ ऑक्टोबर रोजी, जळगाव शहर महानगरपालिकेच्या सर्व सोशल मीडिया खात्यांवरून प्रसारित केले जाणार आहेत.