रेमडेसिविरचा काळाबाजार करणारे बडे मासे सापडतील का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:12 AM2021-04-29T04:12:24+5:302021-04-29T04:12:24+5:30
सुनील पाटील रेमडेसिविरचा काळाबाजार करणारे बडे मासे सापडतील का? सध्या कोरोना हाताबाहेर गेलेला. कधी ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून तर ...
सुनील पाटील
रेमडेसिविरचा काळाबाजार करणारे बडे मासे सापडतील का?
सध्या कोरोना हाताबाहेर गेलेला. कधी ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून तर कधी रेमडेसिविर इंजेक्शन मिळाले नाही, म्हणून रुग्णांचा मृत्यू होतो आहे. शहरातील सर्वच खासगी व सरकारी रुग्णालये कोरोना बाधित रुग्णांनी फुल्ल झालेले आहेत. त्यामुळे ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी वाढली आहे. भविष्यातही याची मागणी वाढू शकते हे लक्षात घेता काही जणांनी ऑक्सिजन व रेमडेसिविरची कृत्रिम टंचाई निर्माण केली आहे. त्यामुळे त्याचा तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. या यंत्रणेने अक्षरशः मृत्यूशी खेळ खेळायला सुरू केलेला आहे. पैसा हेच ध्येय ठेवून रुग्णांची अक्षरशः लूटमार सुरू केलेली आहे. रेमडेसिविर काळाबाजारप्रकरणी आतापर्यंत शहरात बारा जणांना अटक झालेली आहे. यात अधिक खोलवर गेल्यावर अनेक बड्या माशांचा यात सहभाग असल्याचे दिसून येत आहे आणि हेच बडे मासे पकडण्याचे आव्हान यंत्रणेसमोर आहे. याच निमित्ताने ‘कुंपणच शेत खात’ असल्याची चर्चा आता दबक्या आवाजात होऊ लागली आहे. तसं असेल तर यापेक्षा मोठे दुर्दैव कोणतं? ऑक्सिजन व रेमडेसिविरसाठी रुग्णाचे नातेवाईक दारोदार फिरत आहेत. दुसरीकडे सरकारमध्येही रेमडेसिविरवरून राजकारण होऊ लागले आहे. खासगी रुग्णालयांमध्ये अव्वाच्या सव्वा बिले आकारली जात आहेत. यात मृत्यू होतोय रुग्णाचा तर भरडले जातात नातेवाईक. त्याचे सोयरसुतक कोणालाच नसल्याचे दिसून येत आहे. रेमडेसिविरचा काळाबाजार रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी मनावर घेतले म्हणून १४-१५ जणांची साखळी हाती लागली. आता यापुढेही जाऊन त्यांनी मुळाशी जावे व या साखळीतील बड्या धेंडांचे हात कायद्याने छाटावेत. त्यामुळे त्यावर अवलंबून असलेले दलाल काळाबाजार करण्याची हिंमत करणार नाहीत.