जिल्ह्यात आता भाजपचे दोन जिल्हाध्यक्ष होणार?

By Ajay.patil | Published: March 30, 2023 07:38 PM2023-03-30T19:38:45+5:302023-03-30T19:38:58+5:30

लोकसभा मतदारसंघनिहाय होणार रचना, गिरीश महाजनांकडून घेण्यात आला आढावा

Will there be two BJP district presidents in the district? | जिल्ह्यात आता भाजपचे दोन जिल्हाध्यक्ष होणार?

जिल्ह्यात आता भाजपचे दोन जिल्हाध्यक्ष होणार?

googlenewsNext

अजय पाटील, जळगाव: भाजपकडून आगामी जि.प., पंचायत समिती, नगरपालिका व विधानसभा, लोकसभेच्या निवडणुकांच्या दृष्टीने संघटनात्मक बदल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात लोकसभा मतदारसंघनिहाय दोन जिल्हाध्यक्षांची निवड भाजपकडून करण्यात येणार असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे. याबाबत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी प्राथमिक आढावा घेतला असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

भाजपने आतापासूनच निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना अलर्टवर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या बाजार समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, लवकरच जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये पक्षाला चांगले यश मिळावे, यासाठी भाजपने संघटनात्मक बदलाची तयारी केली आहे. तसेच कसबामधील पराभवानंतर वरिष्ठ पातळीवरून संघटनात्मक बदल करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्याची माहितीही भाजपमधील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, रविवारी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपच्या काही ठराविक पदाधिकाऱ्यांसोबत अजिंठा विश्रामगृह येथे बैठक घेऊन, भाजपातील अंतर्गत घडामोडींबाबत चर्चा केली असल्याची माहिती मिळाली आहे.

मोठ्या नेत्यांचा संघटनेतील पदांसाठी ‘ना’

भाजपकडून काही मोठ्या पदाधिकारी व नेत्यांना संघटनेतील जिल्हाध्यक्षपदासह इतर महत्त्वाच्या पदांबाबत विचारणा करण्यात आली होती. मात्र, अनेक मोठ्या पदाधिकाऱ्यांनी संघटनेतील पदांबाबत नकार दिला आहे. भाजपमधील काही बडे पदाधिकारी आगामी विधानसभा निवडणुकांसाठी इच्छुक आहेत; तर काही नेते विद्यमान आमदार आहेत. एकीकडे विधानसभा निवडणुका वर्ष-दीड वर्षावर आल्या आहेत. अशा परिस्थितीत संघटनेचे पद घेतले, तर मतदारसंघात वेळ देता येणार नाही. त्यामुळे बड्या पदाधिकाऱ्यांकडून संघटनेतील पदांबाबत नकारघंटा येत असल्याचीही माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

Web Title: Will there be two BJP district presidents in the district?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा