उभ्या ऊसाच्या गाळपासाठी प्रयत्न करणार - अजित पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 11:53 PM2019-01-19T23:53:40+5:302019-01-19T23:53:52+5:30
भाजप सरकारवर कडाडून टीका
चोपडा : चोपडा सहकारी साखर कारखाना मी चालवणार नाही मात्र गेल्या हंगामातील ऊस उत्पादक शेतकºयांचे दोन कोटी ४४ लाख रुपये साखर आयुक्तांशी चर्चा करून शेतकºयांना देण्यासंदर्भात मार्ग काढला जाईल असे सांगत चोसाका यंदा बंद असल्याने उभा ऊस निश्चितपणे तोडून गाळपासाठी पाठविला जाईल, अशी ग्वाही माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तालुक्यातील शेतकºयांना दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित निर्धार परिवर्तन यात्रा शनिवारी दुपारी १२ वाजता शहरात दाखल झाली. बाजार समितीमध्ये सभा झाली. त्या वेळी अजित पवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी शिक्षण मंत्री फौजिया खान, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार दिलीप सोनवणे, पीपल बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड रवींद्र पाटील, पालिकेतील गटनेते जीवन चौधरी, राज्याच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, अल्पसंख्यांक उपाध्यक्ष गफ्फार मलिक, नगराध्यक्षा मनिषा चौधरी, राष्ट्रवादी आदिवासी जिल्हा सरचिटणीस कांचन राणे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोरख पाटील, चोसाकाचे माजी चेअरमन अॅड. घन:श्याम पाटील, माजी सभापती डी. पी. साळुंखे, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पाटील, चोसाका चेअरमन अतुल ठाकरे, जिल्हा परिषद सदस्या डॉ. नीलम पाटील, राष्ट्रवादीच्या महिला उपाध्यक्षा विजया पाटील, चोसाकाच्या माजी चेअरमन नीता पाटील, प्रभादेवी गुजराथी, कृष्णा पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगन्नाथ पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ललित बागुल, माधुरी पाटील आदी उपस्थित होते.
तालुक्यातील चहार्डी येथील साखर कारखाना अजित पवार चालवतील अशी सर्वत्र चर्चा असताना जाहीर भाषणात अजित पवार यांनी मात्र याचा स्पष्टपणे इन्कार केला. असे असले तरी उभा ऊस निश्चितपणे तोडून तो पुतण्या रोहित पवार हा चालवत असलेला नंदुरबार येथील आणि औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथील कारखान्यात गाळपासाठी पाठविला जाईल, असे आश्वासन पवार यांनी दिले.
शेतीमालाला भाव मिळण्यासाठी परिवर्तन आवश्यक
पूर्वी दिल्ली येथे शरद पवार आणि महाराष्ट्रात आम्ही असल्याने अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मार्ग काढला जायचा. मात्र सध्या विरोधी पक्षात असल्याने आपल्याला अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांवर मार्ग काढता येणे अवघड असल्याचेही अजित पवार म्हणाले. त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणातील पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवून उर्वरीत पाणी शेतकºयांसाठी देण्यासाठी जिल्हाधिकाºयांना सांगणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. देशात आणि राज्यात थापा मारणारे हे भाजपा सरकारवर जनता नाराज आहे. शेतीमालाच्या भावाबाबत न्याय देण्यासाठी आपल्याला निश्चितपणे परिवर्तन करावे लागेल असेही अजित पवार यांनी उपस्थितांसमोर सांगितले.
गिरीश महाजन यांनी महाराष्ट्रातील पाणी गुजरातकडे वळविले- छगन भुजबळ
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, जळगाव जिल्ह्यासह राज्याचे पाणी जळगाव जिल्ह्यातील जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दबावामुळे गुजरातकडे वळविले असा घाणाघाती आरोप करून जिल्हावासीयांनी यासाठी विरोध करणे आवश्यक असल्याचे सांगून जळगाव जिल्हा पाण्यासाठी तडफडत असताना दुर्लक्ष करणाºया अशा मंत्र्यांना बाजूला सारा आणि परिवर्तन घडवा असे आवाहन केले.
केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात बोलताना भुजबळ पुढे म्हणाले की, ‘अच्छे दिन’ नाही तर ‘बचे कितने दिन’ असे आता लोक म्हणायला लागले आहेत. शेतीमालाला भाव देत नसताना अडावद येथे कांदा मार्केटमध्ये असंख्य ट्रक आणि ट्रॅक्टर उभे असून त्यांची भेट घेतली असता एका क्विंटल कांद्याला ८०० रुपये खर्च येत असताना केवळ शंभर, दोनशे आणि तीनशे रुपये प्रती क्विंटल कांदा द्यावा लागत आहे. शेतकºयांचा खर्चही वसूल होत नाही असे असताना शेतकºयांना भरपूर देणार असे म्हणणारे पंतप्रधान मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला केली बंदी आणि डान्स बारची उठवली बंदी असे हे सरकार आहे. यासोबत या सरकारने सहकार क्षेत्रही संपविलेले असून सर्वच ठिकाणी भाजपा सरकार नापास झालेले असल्याची टीका भुजबळ यांनी केली.
महाराष्ट्र सदनाचे काम शंभर कोटी रुपयांचे असताना साडेआठशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचे सांगून सरकार दिशाभूल करत आहे, असे छगन भुजबळ यांनी सांगत त्यांनी सरकारवर टीका केली.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही नरेंद्र मोदी आणि भाजपाचे आमदार बेताल व खोटी वक्तव्य करण्याचे व्हिडिओ दाखवित असल्याचे सांगून केंद्रात आणि राज्यात खोटारडे सरकार असल्याचे सांगितले. अरुणभाई गुजराथी यांनीही मनोगत व्यक्त केले.
सभेत ‘लोकमत’चा अंक दाखविला
छगन भुजबळ हे भाषण करीत असताना त्यांनी हातात ‘लोकमत’चा अंक घेऊन पहिल्या पानावरील नऊ महिन्यांत ५०० लहान मुले दगावल्याची बातमी असल्याचा मुद्दा उपस्थितांसमोर मांडला. उच्च न्यायालयाने हा अहवाल जाहीर केला असून याकडे भाजपा सरकार दुर्लक्ष करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
शेतकरी कृती समितीतर्फे अजित पवार यांना निवेदन
जळगाव येथून अजित पवार चोपडा येथे येत असताना धरणगाव नाक्याजवळ शेतकरी कृती समितीचे मुख्य प्रवर्तक एस. बी. पाटील आणि शेकडो शेतकºयांनी गाड्यांंचा ताफा अडवून अजित पवार यांना चोपडा साखर कारखाना संदर्भात लेखी निवेदन दिले. तालुक्यातील शेतकºयांच्या शेतांमध्ये उभा असलेला ऊस तोडण्यासंदर्भात तसेच गेल्या हंगामातील ऊस उत्पादक शेतकºयांचे थकीत दोन कोटी ४४ लाख रुपये मिळवून देण्यासाठी विनंती केली.
सूत्रसंचालन चंद्रहास गुजराथी आणि राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष संजय कानडे यांनी केले.