ममुराबादला अर्ज माघारीसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:13 AM2021-01-02T04:13:45+5:302021-01-02T04:13:45+5:30
६३ उमेदवारी अर्ज : बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद : ग्रामपंचायतीच्या १७ जागांकरिता होणाऱ्या निवडणुकीसाठी सुमारे ६३ ...
६३ उमेदवारी अर्ज : बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : ग्रामपंचायतीच्या १७ जागांकरिता होणाऱ्या निवडणुकीसाठी सुमारे ६३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यातील अनेकांनी बिनविरोध निवड व्हावी म्हणून एकमेकांची मनधरणी सुरू केली असून, प्रत्येक वाॅर्डात त्या दृष्टीने हालचालींना वेगसुद्धा आला आहे.
गावात एकूण सहा प्रभाग आहेत. त्यातील प्रभाग क्रमांक एकमध्ये दोन जागांसाठी तर अन्य सर्व प्रभागांत प्रत्येकी तीन जागांसाठी यंदा निवडणूक होत आहे. सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीपूर्वी जाहीर न झाल्याने सुरुवातीला सर्व प्रभागांत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी फार उत्साह दिसत नव्हता; मात्र नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होताच इच्छुकांमध्ये अचानक उत्साह संचारला. जातनिहाय आरक्षण सोडतीनुसार विविध प्रभागांत अर्ज दाखल करण्यासाठी अक्षरशः झुंबड उडाली. तहसील कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार ममुराबाद येथील प्रभाग तीन व चारमध्ये प्रत्येकी १३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. खालोखाल प्रभाग एक तसेच दोनमध्ये प्रत्येकी ११ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्याचप्रमाणे प्रभाग पाचमध्ये सहा व प्रभाग सहामध्ये नऊ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. काही उमेदवारांनी एकापेक्षा जास्त प्रभागांत अर्ज दाखल केले असून, ऐनवेळी सोईच्या प्रभागातील एकमेव अर्ज ते ठेवतील, तर काही जण माघार घेऊन आपल्या जवळच्या उमेदवाराला कदाचित पाठिंबा देतील. अर्ज माघारीनंतर खऱ्या अर्थाने अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होईल. त्याकडे ग्रामस्थांचे आता लक्ष लागले आहे.