अवघ्या तासाभरात साड्या चोर पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:12 AM2021-06-05T04:12:25+5:302021-06-05T04:12:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : माहेरी गेलेल्या शिक्षिकेच्या बंद घरातून महागड्या साड्या चोरणाऱ्या अल्पवयीन चोरट्यास तासाभरात ताब्यात घेण्यात एमआयडीसी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : माहेरी गेलेल्या शिक्षिकेच्या बंद घरातून महागड्या साड्या चोरणाऱ्या अल्पवयीन चोरट्यास तासाभरात ताब्यात घेण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीला गेलेल्या साड्या हस्तगत केल्या आहे तर त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे.
बांभोरी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका वृंदा गणपत गरुड ह्या मोहाडी रस्ता येथे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. दरम्यान, पती हे पुण्यातील मोठ्या मुलीकडे गेले होते. नंतर ४ मे रोजी वृंदा या सुध्दा धुळे येथे माहेरी गेल्या होत्या. तेव्हापासून घर कुलूप बंद होते. ही संधी साधून चोरट्यांनी घरात डल्ला मारला. गुरुवारी सकाळी पुतण्या कुणाल याच्या घटना लक्षात येताच, त्याने काकू वृंदा यांना चोरीची माहिती दिली. वृंदा यांनी लागलीच जळगाव गाठले. घराची पाहणी केली असता, २५ हजार रुपये किमतीच्या साड्या घरातून चोरीला गेल्याचे समोर आले.
तांबापुरातून घेतले ताब्यात
गुरुवारी सकाळी ७ वाजता पोलिसांनी घटनास्थळ गाठले होते. त्यांनी घराची पाहणी केल्यानंतर आजू-बाजूला चौकशी केली. तेवढ्यात एक अल्पवयीन मुलगा गाठोडे घेऊन तांबापुराच्या दिशेने जाताना दिसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. क्षणाचा विलंब न करता, पोलिसांनी तांबापुरा गाठले व अल्पवयीन चोरट्यास तासाभरात ताब्यात घेतले. त्याने चोरी केल्याची कबुली दिली असून चोरलेल्या साड्या पोलिसांना काढून दिल्या आहेत. दरम्यान, त्याच्यासोबतचा साथीदार हा फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
यांनी केली कारवाई
ही कारवाई एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, मुदस्सर काझी, इम्रान सैयद, साईनाथ मुंडे, सुधीर साळवे, सचिन पाटील, गोविंदा पाटील आदींनी केली आहे.