दोनच दिवसात जळगाव मनपाचे व्यवहार उधारीवर सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 12:38 PM2019-06-29T12:38:00+5:302019-06-29T12:38:48+5:30
बिले थांबवली
जळगाव : हुडको कर्जाप्रकरणी डीआरटीकडून मनपाचे खाते सील करण्यात आले असल्याने दोनच दिवसात मनपाचे सर्व व्यवहार उधारीवर सुरु झाले आहेत. अंतर्गत व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. काही महत्वाच्या कामांसाठी लागणारा खर्च उधारीवर सुरु असल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली आहे.
२ जुलै रोजी मुंबई उच्चन्यायालयात मनपाने दाखल केलेल्या पुर्नविलोकन याचिकेवर कामकाज होणार आहे. या दरम्यान जर मनपाला काही दिलासा मिळाला नाही. तर मनपात आर्थिक आणिबाणीची परिस्थिती ओढावण्याची शक्यता आहे. मनपा प्रशासनाने सर्व मक्तेदारांची बिले देखील थांबवली असून, २ रोजी दिलासा न मिळाल्यास कर्मचाऱ्यांचे वेतन देखील होवू शकणार नसल्याची माहिती मनपा सूत्रांनी दिली आहे.
लोकप्रतिनिधींनी फिरवली पाठ
महापालिकेचे खाते सील झाल्यामुळे मनपावर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले असताना मनपात लोकप्रतिनिधींनी पाठ फिरविल्याचे चित्र दोन दिवसात दिसून आले आहे. महापौर सीमा भोळे या देखील दोन दिवसात मनपात आलेल्या नाहीत. तर उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे काही तासांपुरतेच मनपात आले होते. स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे हे शुक्रवारी मनपात आले नाही तर गुरुवारी त्यांनी मनपाच्या वित्त व लेखाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. मात्र, यावर उपाययोजनांबाबत कोणतीही चर्चा लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली नसल्याचे दिसून येत आहे. मोठे संकट उभे असताना लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेबाबत देखील प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.
तर नागरिकांना मिळणाºया सुविधांवरही होणार परिणाम
मनपाची खाते जर लवकर उघडण्यात आली नाहीत तर त्याचा परिणाम नागरिकांना मिळणाºया सुविधांवर देखील होण्याची शक्यता आहे. कचरा संकलनाच्या वाहनांमध्ये इंधन टाकणे, वाहनांची दुरुस्तीचा खर्च, वीज बील, सेवानिवृत्तांचे पेन्शन, सर्व रोखले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील साफ सफाईवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच मक्तेदारांची बिले थकीत राहिल्यास शहरात सुरु असलेले कामे देखील थांबण्याची शक्यता आहे.