आठवडाभरात दोन नवमातांचा कोरोनामुळे मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 18:35 IST2021-04-15T18:33:18+5:302021-04-15T18:35:20+5:30
कुऱ्हाड गावातील दोन नवमातांचा कोरोनामुळे आठवडाभरात मृत्यू झाला आहे.

आठवडाभरात दोन नवमातांचा कोरोनामुळे मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
कुऱ्हाड, ता. पाचोरा : कुऱ्हाड गावातील दोन नवमातांचा कोरोनामुळे आठवडाभरात मृत्यू झाला आहे. त्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.कुऱ्हाड खुर्द येथील माहेर असलेली व नुकतेच मागील वर्षी लग्न झालेल्या विवाहितेचा प्रसुतीनंतर कोरोनामुळे मृत्यू झाला. तिने तीन दिवसापूर्वी एका गोंडस कन्येला जन्म दिला. ज्योती राजेंद्र जमादार (२०, पाटणा ता .चाळीसगाव) येथील सासर असलेली विवाहिता प्रसुतीसाठी कुऱ्हाड येथील आपल्या माहेरी आली होती; परंतु प्रसूतीअगोदरच कोरोनबाधित आढळल्याने तिला तिच्या नातेवाईकांनी पाचोराजळगावसारख्या ठिकाणी हलवले असता तिला एकाही दवाखान्याने दाखल करून घेतले नाही.
दवाखान्याच्या फिराफिरीत तिला जास्त त्रास जाणवत असल्याने शेवटी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलवले. तेथे तीन दिवसापूर्वी सर्वसाधारण प्रसूती होऊन बाळाला जन्म दिला. त्यातच बुधवारी रात्री तिची तब्येत अधिकच खालावल्याने उपचारादरम्यान आज सकाळी निधन झाले. कोरोना बाधित असल्याने तिच्यावर आज दुपारी औरंगाबाद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अवघ्या तीन दिवसाच्या बालकाचे मातृछत्र नियतीने तिच्यापासून हिरावले. या आठवड्याभरात दोन नवतरुण मातांचा प्रसूतीनंतर मृत्यू झाल्याने कुऱ्हाड गावावर सन्नाटा पसरला.