वर्षभरातच विमान जमिनीवर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 01:21 PM2018-10-19T13:21:56+5:302018-10-19T13:22:33+5:30
जळगावकरांनी विमानसेवेला चांगला प्रतिसाद दिल्यास एक नव्हे तर दोन फे-या सुरु करु असे आश्वासन एअर डेक्कनचे मालक गोपीनाथ यांनी जळगावात शुभारंभप्रसंगी दिले होते
विकास पाटील
मुंबई-जळगाव विमानसेवेला वर्षपूर्ण होत नाही तोच ही सेवा बंद पडली. गतवर्षी २३ डिसेंबर रोजी विमानसेवेला प्रारंभ झाला होता. हवाई चप्पल घालणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हवाई प्रवास करता आला पाहिजे, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा असल्याने केंद्र शासनाने उडान ही योजना सुरु केली. या योजनेंतर्गत राज्यातील १० शहरांची निवड करण्यात आली होती. त्यानुसार जळगाव-मुंबई विमानसेवेला प्रारंभ झाला होता. जळगावकरांचे विमानसेवेचे स्वप्न पूर्ण झाले मात्र नऊ महिन्यात अडथळ्यांचाच प्रवास राहिला.
विमानसेवेच्या पहिल्या दिवसापासून विमानाला विलंब झाला. मुंबईहून जळगावात कधीच वेळेवर विमान पोहचले नाही. मुंबई विमानतळावर दर अर्ध्या सेकंदाला एक विमान येत असते, दिवसभरात साधारणत: ९९८ विमानांची ये-जा असते. त्यामुळे प्रादेशिक विमानसेवेसाठी लवकर स्लॉट उपलब्ध होत नसल्याने विमानाला विलंब होत असे. लहान शहरे मोठ्या शहरांशी जोडून त्यांचा विकास करण्यासाठी जर केंद्र शासनाने उडान ही योजना सुरु केली आहे तर स्लॉटची अडचण यायलाच नको. कारण ही योजना सुरु करण्यापूर्वीच या अडचणीवर मार्ग काढणे आवश्यक होते. एअर डेक्कन या विमान कंपनीचे संचालक कॅप्टन गोपीचंद यांनी सुद्धा मुंबई विमानतळावर प्रचंड वर्दळ असल्याने २५ टक्के रिजनल कनेक्टीव्हीटी ‘उडान’साठी राखीव ठेवली पाहिजे, अशी अपेक्षा विमानसेवेच्या शुभारंभप्रसंगी जळगावात व्यक्त केली होती. ती नऊ महिन्यात पूर्ण झाली नाही. ती झाली असती तर कदाचित विमान जळगावात वेळेवर पोहचले असते. असे असतानाही जळगावकरांनी विमानसेवा बंद पडू नये म्हणून विमानसेवेला प्रतिसाद दिला.
जैन उद्योग समुहाने तर सहा महिन्यांची २५ टक्के तिकिटे आगावू घेतली. एवढेच नव्हे तर विमानसेवेच्या पहिल्याच दिवशी सात लाखाचा धनादेश एअर डेक्कन कंपनीला दिला होता. मात्र स्लॉटची अडचण शेवटपर्यंत कायम राहिली. या व इतर काही अडचणींमुळे विमानसेवा १४ मार्चपासून तर १९ एप्रिलपर्यंत म्हणजेच ३७ दिवस बंद होती. त्यानंतर २० एप्रिलपासून सेवा पुन्हा सुरु झाली. तेव्हापासून तर सप्टेंबर अखेरपर्यंत सेवा सुरु होती. अखेर १५ दिवसांपूर्वी विमान हवेतून जमिनीवर आले. ते आता जळगावच्या दिशेने केव्हा झेप घेईल, याबाबत अनिश्चितता आहे.
आमदार, खासदारांनी ही सेवा सुरळीत चालण्यासाठी पाहिजे तसे प्रयत्न नऊ महिन्यात केल्याचे दिसून आले नाही. मात्र किमान आता हीसेवा पुन्हा सुरु व्हावीयासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तरच ही सेवा पुन्हा सुरु होईल. जळगावकरांनी विमानसेवेला चांगला प्रतिसाद दिल्यास एक नव्हे तर दोन फे-या सुरु करु असे आश्वासन एअर डेक्कनचे मालक गोपीनाथ यांनी जळगावात शुभारंभप्रसंगी दिले होते. किमान एक विमान जरी वेळेवर सुरु ठेवले तरी पुरे होईल, असा सूर जळगावकरांकडून व्यक्त होत आहे.