कॉफीत गुंगीचे औषध टाकून महिलेवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 12:46 PM2020-03-12T12:46:30+5:302020-03-12T12:47:45+5:30
व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत वर्षभर अत्याचार
जळगाव : कॉफीत गुंगीचे औषध टाकून एका ३५ वर्षीय महिलेवर जामनेरच्या भोंदूबाबाने अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या बाबाने अत्याचाराचा व्हिडीओ तयार केला व तो व्हायरल करण्याची धमकी देत औरंगाबाद, दिल्ली, बीड, इंदूर, मुंबई येथील हॉटेल व जळगावात वर्षभर अत्याचार केला. पीडितेने बुधवारी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून आपबिती कथन केली. किशोर सटवाजी जोशी (शास्त्री) रा.शिक्षक कॉलनी, जामनेर असे भोंदूबाबाचे नाव आहे. त्याच्याविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पीडितचे पती बीड येथे नोकरीला आहेत. दोघांमध्ये वादविवाद आहेत. त्यामुळे पीडिता वर्षभरापासून शहरात राहत असून सामाजिक कार्यकर्ती म्हणून काम करीत आहे. पीडिता व पतीत कौंटुबिक वाद असल्याने जामनेर येथील करणी सेना तालुकाध्यक्ष रतन परदेशी यांनी किशोर जोशी याच्याबाबत माहिती देवून तो पूजा करुन कौटुंबिक वादातून सुटका मिळवून देतो असे सांगून त्याच्याशी ओळख करुन दिली. त्यामुळे पीडिता जोशी याला जळगावात भेटण्यासाठी आली असता २०१८ वर्ष आपल्यासाठी चांगले नाही २०१९ वर्ष चांगले राहिल, त्यासाठी पूजा करावी लागेल असे सांगून १ जानेवारी २०१९ रोजी औरंगाबाद येथील हॉटेल अतिथी येथे बोलावून घेतले. तेथे दोन तास पूजा केली. त्यानंतर जोशी याने पीडितेला कॉफी दिली. कॉफी पिल्यानंतर पीडितेला गुंगी आली. पहाटे तीन वाजता जाग आली असता जोशी याने अत्याचार केल्याचे जाणवले. याबाबत त्याला विचारणा केली असता त्याने व्हिडीओ क्लीप दाखविली. हे पाहून घाबरलेल्या पीडितेने आरडाओरड केली, मात्र त्याने हा प्रकार कोणाला सांगितला तर व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत तीन दिवस हॉटेललाच थांबवून घेत तेथे शारीरीक संबंध प्रस्थापित केले.
पतीपासून वेगळे राहण्यास भाग पाडले
या घटनेनंतर ४ जानेवारी २०१९ रोजी पीडिता बीड येथे घरी गेली. त्यानंतर पंधरा दिवसांनी जोशी याने पीडिताला परत फोन करुन पतीपासून वेगळे रहा, अन्यथा पतीला ही क्लीप दाखवेल म्हणून धमकावले. त्यामुळे पीडितेने बीडमध्ये भाड्याने घर घेतले. तेथेही जोशी याने परत क्लिप दाखविण्याची व मुलांना मारण्याची धमकी देत पीडितेवर अत्याचार केला. त्यानंतर मुंबई, दिल्ली, बीड, इंदूर व भिलवाडा (राजस्थान) येथील हॉटेलमध्ये सातत्याने अत्याचार केले.
पोटात लाथाबुक्यांनी केली मारहाण
२८ डिसेंबर २०१९ रोजी मुलगा सुमीत जोशीच्या न्यायालयीत कामासाठी जळगावात बोलावून घेतले. तेव्हापासून पीडिता जळगावातच वास्तव्याला आहे. ९ मार्च २०१० रोजी किशोर जोशी याने दत्तक घेतलेली मुलगा मेघना जोशी हिच्याशी फोनवर बोलल्याचा राग आल्याच्या कारणावरुन रात्री ११ वाजता पीडितेला पोटात लाथाबुक्यांनी मारहाण केली. याबाबत पोलिसात तक्रार करते, असे सांगितले असता परत जोशी याने त्याच क्लिपचा आधार घेऊन धमकावले. त्रास असह्य झाल्याने पीडितेने बुधवारी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून निरीक्षक रणजीत शिरसाठ यांना घटनाक्रम सांगितला. मानव संसाधन विभागाच्या सहायक निरीक्षक सुनंदा पाटील यांनी पीडितेचा जबाब नोंदविला. त्यानंतर किशोर जोशी याच्याविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल झाला.