धरणगावच्या महिलेला ४७ दिवसांनी जीएमसीतून घरी सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:13 AM2021-06-03T04:13:39+5:302021-06-03T04:13:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : धरणगाव तालुक्यातील शेतकरी महिलेवर कोरोनाबाधित झाल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुमारे ४७ दिवस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : धरणगाव तालुक्यातील शेतकरी महिलेवर कोरोनाबाधित झाल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुमारे ४७ दिवस यशस्वी उपचार केल्यानंतर बुधवारी, २ जून रोजी यशस्वीरीत्या डिस्चार्ज देण्यात आला.
धरणगाव तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकरी महिलेला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर १६ एप्रिल रोजी एका खासगी रुग्णालयातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी तिची ऑक्सिजन पातळी ७५ होती. अतिदक्षता विभागामध्ये तिच्यावर उपचार करण्यात आले. नऊ दिवसांनंतर तिची प्रकृती धोक्याच्या बाहेर आली. त्यानंतर तिला अतिदक्षता विभागातून कक्ष क्रमांक ९ मध्ये हलविण्यात आले. पुढील १ महिना १० दिवस कक्षामध्ये वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. गेल्या ४ दिवसांपासून तिची ऑक्सिजन पातळी नियंत्रणात आली.
अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली औषध वैद्यक शास्त्र विभागाचे सहयोगी प्रा. डॉ. विजय गायकवाड, डॉ. शालमी खानापूरकर, डॉ. आस्था गणेरीवाल, रूपाली जोशी, प्रतिभा खंडारे, ललित सोनवणे, माधुरी टोकरे, सपना ढोले यांनी तिच्यावर उपचार केले.
बुधवारी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी महिलेला पुष्पगुच्छ देत रुग्णालयातून निरोप दिला. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. विलास मालकर, डॉ. विजय गायकवाड, डॉ. आस्था गणेरीवाल उपस्थित होते.