दहा दिवसांपूर्वी सिझेरीयन झालेल्या महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:19 AM2021-08-14T04:19:58+5:302021-08-14T04:19:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सिझेरियन झालेल्या जळगावातील रथ चौकातील रहिवासी महिला गायत्री रोशन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सिझेरियन झालेल्या जळगावातील रथ चौकातील रहिवासी महिला गायत्री रोशन पाटील (वय २३) यांचा शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. याआधी गेल्या पंधरा दिवसात जीएमसीमध्ये तीन गर्भवती महिलांचा मृत्यू झाला आहे. हा या कालावधीतील चौथा मृत्यू आहे. दरम्यान, गायत्री यांच्या मृत्यूमुळे त्यांचे अवघ्या दहा दिवसांचे बाळ आईपासून पोरके झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
गायत्री पाटील यांना ३० जुलै रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले होते. ३१ जुलै रोजी सिझेरियन करण्यात आले. यात गायत्री यांनी एका मुलीला जन्म दिला. यानंतर त्या याच ठिकाणी दाखल होत्या. मध्यंतरी त्यांची प्रकृती खालावत गेली. बुधवारी त्यांना उलटी झाली. मात्र, त्या बेशुद्ध असल्याने त्याचे कण फुफ्फुसात गेल्यामुळे त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली होती. यातच सुरुवातीला त्यांची किडनी निकामी झाली. अतिदक्षता विभागात गुरुवारी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी ७ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. श्रीकृष्ण चव्हाण यांनी दिली.
गेल्या पंधरा दिवसात चौथ्या महिलेचा मृत्यू
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या पंधरा दिवसात चार महिलांचा मृत्यू झाला आहे. यात तीन गर्भवती, तर एका महिलेचा प्रसुतीनंतर मृत्यू झाला. यात पुरेसे पोषण न मिळाल्याने बुधवारी रात्री एका महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेला एक दिवस उलट नाही तोच दुसऱ्या दिवशी एका महिलेचा मृत्यू झाला.
माहिती देण्यास उशीर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात घटना घडल्यानंतर ती लपविण्याचा प्रयत्न होत असल्याचे चित्र समोर येत आहे. विभागात चौकशी केली असता अतिदक्षता विभागात मृत्यू झाल्याचे कारण सांगून हात झटकले जातात, तर आपत्कालीन विभागात कक्षातील डॉक्टरच सांगतील, अशी उत्तरे दिली जात आहेत. शिवाय डॉक्टरांकडूनही ही माहिती मिळत असल्याने माहिती लपविली जात आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
केवळ चौकशी समित्या...पुढे काय?
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर डॉक्टरांवर विविध प्रकारचे आरोप करण्यात आल्याच्या घटना वाढल्या आहेत. यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या. मात्र, या समित्यांनी नेमके केले काय, हे समोर आलेले नाही. त्यातच काही दिवसांपूर्वी अतिदक्षता विभागात एका मृत महिलेचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. या तक्रारीनंतर तातडीने कार्यवाही सोडून एक समिती नेमण्यात आली. या समितीची बैठक घेण्यात आली. त्यामुळे केवळ समित्या नेमून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न होत आहे का? असाही एक प्रश्न निर्माण झाला आहे.