प्रसुतीनंतर महिलेचा मृत्यू, डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप; सिव्हीलमध्ये नातेवाईकांचा ठिय्या, कारवाईची मागणी

By सागर दुबे | Published: December 22, 2022 05:29 PM2022-12-22T17:29:53+5:302022-12-22T17:30:25+5:30

अधिष्ठाता यांनी संपूर्ण प्रकाराची माहिती घेवून चौकशी करतो आणि धुळे येथे इन कॅमेरा शवविच्छेदन करण्याच्या सूचना केल्यानंतर आंदोलनाला स्थगिती देण्यात आली. नंतर मृतदेह धुळ्याकडे रवाना करण्यात आला.

Woman dies after delivery, doctors accused of negligence in jalgaon | प्रसुतीनंतर महिलेचा मृत्यू, डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप; सिव्हीलमध्ये नातेवाईकांचा ठिय्या, कारवाईची मागणी

प्रसुतीनंतर महिलेचा मृत्यू, डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप; सिव्हीलमध्ये नातेवाईकांचा ठिय्या, कारवाईची मागणी

Next


जळगाव : प्रसुतीनंतर उपचारात शिकाऊ डॉक्टरांकडून झालेल्या हजगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करित संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी गुरूवारी दुपारी १ वाजता जिल्हा रूग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ संतप्त नातेवाईकांसह रहिवाशांनी ठिय्या आंदोलन केले. आरती विकास गवळी (२२, रा. समता नगर) असे मृत महिलेचे नाव आहे.

समता नगरातील आरती गवळी यांना शनिवार, दि. १० डिसेंबरला दुपारी ४ वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयात प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, सोनोग्राफी न करता सायंकाळी ७ वाजता त्यांची शिकाऊ डॉक्टरांनी सिजरद्वारे प्रसुती केली. रात्रीच आरती यांचा रक्तदाब कमी होवून प्रकृती चिंताजनक झाली. ही माहिती डॉक्टरांनी नातेवाईकांना देवून रूग्णाला खाजगीमध्ये हलविण्याचा सल्ला दिला. मात्र, महिलेला कुटूंबियांकडे सोपविण्यास सुध्दा डॉक्टरांनी तीन ते चार तासांचा विलंब केला. त्यामुळे आणखी महिलेची प्रकृती बिघडली. मध्यरात्री १ वाजता महिलेला खाजगी रूग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. त्यानंतर अकरा दिवसांपासून महिलेवर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होती.

सकाळी मालवली प्राणज्योत...
गुरूवारी सकाळी आरती गवळी यांची उपचारादरम्यान खासगी रूग्णालयात प्राणज्योत मालवली. मृतदेह कुटूंबियांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात आणून शिकाऊ डॉक्टरांकडून प्रसुतीनंतर प्राथमिक उपचारसुध्दा व्यवस्थित केले नसून डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटूंबियांसह नातेवाईकांनी केला. त्यानंतर महिलेची इन कॅमेरा शवविच्छेदन व्हावे, संबंधितांवर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी जिल्हा रूग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ संतप्त नातेवाईकांसह रहिवाशांनी आरपीआयचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस उपधीक्षक संदीप गावीत यांनी रूग्णालयात येवून नातेवाईकांशी संवाद साधला. त्यानंतर नातेवाईकांनी अधिष्ठाता व वैद्यकीय अधीक्षक यांची भेट घेतली. अधिष्ठाता यांनी संपूर्ण प्रकाराची माहिती घेवून चौकशी करतो आणि धुळे येथे इन कॅमेरा शवविच्छेदन करण्याच्या सूचना केल्यानंतर आंदोलनाला स्थगिती देण्यात आली. नंतर मृतदेह धुळ्याकडे रवाना करण्यात आला.
 

Web Title: Woman dies after delivery, doctors accused of negligence in jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.