ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने जळगावात महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:18 AM2021-04-28T04:18:14+5:302021-04-28T04:18:14+5:30
फोटो : २८ सीटीआर ५१ पान १ साठी लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने प्रतिभा कैलाससिंग ...
फोटो : २८ सीटीआर ५१
पान १ साठी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने प्रतिभा कैलाससिंग परदेशी (४८, रा.सावदा, ता.रावेर) या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी जळगाव शहरातील मेहरुणमधील सारा हॉस्पिटलमध्ये घडली. दरम्यान, याप्रकरणी दोषी डॉक्टर व कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा कुटुंबीयांनी घेतला.
प्रतिभा परदेशी यांचा मुलगा उद्धव व मुलगी शुभांगी यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार,आई प्रतिभा परदेशी यांना कोरोनाची लागण झाल्याने १६ मार्च रोजी सारा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आता त्यांची कोरोनाची चाचणीही निगेटिव्ह आली होती. मात्र अधूनमधून त्यांना ऑक्सिजनची गरज भासत होती. मंगळवारी प्रतिभा परदेशी यांना ज्या लाइनमधून ऑक्सिजन पुरवठा होत होता, ती लाइन बंद पडली. डॉक्टरांना त्याची कल्पना दिली असता त्याकडे दुर्लक्ष केले. दहा मिनिटं ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून आईचा मृत्यू झाल्याचा आरोप उद्धव व शुभांगी या भावंडांनी केला. दरम्यान, गेल्या महिन्यात प्रतिभा यांच्या पतीचाही कोरोनाने मुक्ताईनगर येथे मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
कोट...
ऑक्सिजन पुरवठा करणारी लाइन बंद पडली. दहा मिनिटे ऑक्सिजन पुरवठा थांबला. त्यामुळे आईचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजन बंद झाल्याचे स्टाफच्या निदर्शनास आणून दिले, मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आईच्या मृत्यूस हॉस्पिटल प्रशासनच जबाबदार आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी.
- उद्धव कैलाससिंग परदेशी, प्रतिभा यांचा मुलगा
कोट...
प्रतिभा परदेशी यांचे फुप्फुस ९० टक्के खराब झालेले होते. त्यांना येथून दुसरीकडे हलविण्याबाबत नातेवाइकांना वारंवार सांगितले होते. रुग्णाला ऑक्सिजन मिळाला नाही हा आरोप चुकीचा आहे. रुग्णालयात ऑक्सिजनची एकच लाइन आहे. ७० रुग्णांना त्यातूनच ऑक्सिजन पुरवला जात आहे. परदेशी ज्या वाॅर्डात होत्या, त्यांच्या शेजारीच आठ रुग्ण व्हेंटिलेटर व ऑक्सिजनवर आहेत. ऑक्सिजन बंद झाला असता तर इतर रुग्णही दगावले असते.
- डॉ. मिनाज पटेल, सारा हॉस्पिटल