बोदवड ग्रामीण रुग्णालयात महिलेने दिला सयामी जुळ््यांना जन्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:29 PM2018-05-25T12:29:58+5:302018-05-25T12:29:58+5:30
डॉक्टरांनी वाचविले महिलेचे प्राण
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २५ - बोदवड येथे ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या ममता बळीराम सोनवणे (२२, रा. करंजी, ता. बोदवड) या महिलेने छातीचा भाग जुळलेल्या दुर्मीळ अशा सयामी जुळ््यांना बुधवारी संध्याकाळी जन्म दिला. मात्र महिलेच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी असल्याने व अर्भकाचे पाय गर्भाशयाबाहेर आल्याने हे जुळे दगावले. दरम्यान, सुरुवातीपासून या महिलेने वेळीच तपासणी केली असती तर बालकांना वाचवून त्यांना वेगळेही करता आले असते, असे जळगावातील स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. उदयसिंग पाटील यांनी सांगितले.
ममता सोनवणे या महिलेला बोदवड ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिची तपासणी केली असता तिच्या शरीरात केवळ सातच टक्के रक्त असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यात प्रसूती दरम्यान दोन्ही बालकांचे चारही पाय गर्भाशयाबाहेर आहे व महिलेची प्रकृती गंभीर होत गेली. तिला जळगावला हलविण्याशिवाय पर्याय नव्हता, मात्र तिची प्रकृती पाहता तिला हलविणेही शक्य नव्हते. त्या वेळी तेथे डॉ. धनश्री पाटील, डॉ. उदय पाटील, डॉ. राजेश बार्गल, डॉ. अमोल गिरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी जळगाव येथे डॉ. उदयसिंग पाटील यांच्याशी संपर्क साधून प्रसूतीबाबत मार्गदर्शन घेतले व आपले कसब पणाला लावून महिलेची सामान्य (नॉर्मल) प्रसूती केली. यामध्ये दोनही बालक दगावलेले असले तरी महिलेला सुरक्षित ठेवण्यात डॉक्टरांना यश आले.
सुरुवातीपासून तपासणी केली नाही
सदर महिलेने सुरुवातीपासून कोणत्याच तपासण्या केल्या नसल्याचे सांगण्यात आले. तपासणी झाली असती तर तिच्या पोटात जुळे असल्याचे समजले असते व वेळीच योग्य प्रसूती होऊन सयामी जुळ््यांना मुंबई येथे हलवून वेगळे करता आले असते, असे डॉ. उदयसिंग पाटील यांनी सांगितले.
५० हजारातून एक केस
५० हजारातून एक असे दुर्मीळ सयामी जुळे आढळून येतात. मात्र या केसमध्ये महिलेच्या शरीरात रक्ताचे प्रमाण अत्यंत कमी असताना तिने कधी तपासणीही केली नाही, त्यामुळे असा गंभीर प्रसंग ओढावला गेला. त्यासाठी महिलांनी व कुटुंबीयांनी वेळीच लक्ष द्यावे, असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले आहे.